नवी दिल्ली – मंगळवारी रुपयाच्या मूल्यात बरीच घट झाल्यामुळे सोन्याचे दर 389 रुपयांनी वाढून 48,866 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. जागतिक परिस्थिती सुधारली असल्यामुळे व अमेरिकेतील राजकीय अस्थिरता कमी झाल्यामुळे गेल्या दोन दिवसात जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी झाले आहेत.
भारतातही गेल्या दोन दिवसात सोन्याचे दर कमी झाले होते. मात्र आज त्यात वाढ झाली.
तयार चांदीचे दर 1,137 रुपयांनी वाढून 64,726 रुपये प्रति किलो झाले. मंगळवारी सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर 24 पैशांनी कमी झाला होता.
भारत आपल्या गरजेचे सोने आयात करतो. रुपयाचे मूल्य कमी झाल्यामुळे आयात महागात पडते. त्यामुळे रुपया घसरल्यानंतर सोन्याचे दर वाढतात. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,853 डॉलर प्रति औंस तर चांदीचा दर 25.14 डॉलर प्रति औंस इतका झाला.
रुपयाच्या घसरणीबरोबर ज्या गुंतवणूकदारांना आर्थिक परिस्थिती वेगाने पूर्वपदावर येण्याबाबत शंका आहे, ते काही प्रमाणात सोने खरेदी करीत असल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली असे एचडीएफसी सिक्युरिटी विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. एकूण परिस्थिती पाहता दिर्घ पल्ल्यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी सोने 50 हजार रुपयांच्या खाली आल्यानंतर खरेदी करण्यास हरकत नाही, असे काही विश्लेषक सुचवितात.