पणजी – ख्रिसमस आणि इयर एंडच्या काळात गोव्यात दरवर्षी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते पण यावेळी मात्र सर्वत्र शुकशुकाट दिसत असून करोनामुळे विदेशातून येणाऱ्या पर्यटकांवरही प्रचंड प्रमाणात विपरीत परिणाम झाला आहे.
त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गोव्यात दरवर्षीै या सीझन मध्ये चार्टर्ड फ्लाईट करून विदेशातून पर्यटक येत असतात पण यावेळी करोना निर्बंधांमुळे ही सारी चार्टर्ड फ्लाईटची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. पर्यटकांअभावी राज्याच्या पर्यटन व्यवसायाचे किमान एक हजार कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
राज्याच्या पर्यटन विभागाच्यावतीने एका खासगी कंपनी मार्फत सर्वेक्षण करून झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यात आला. त्यात पर्यटन व्यवसायाचे किमान दोन हजार ते साडे सात हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नोकऱ्यांचे प्रमाणही 35 ते 58 टक्क्यांनी कमी झाले आहे.
जुन्या गोव्यात सेंट झेव्हीएर येथे वार्षिक प्रसादाचा कार्यक्रम होतो. त्यासाठी हजारो लोक गर्दी करीत असतात पण यंदा हा सोहोळा शांततेतच पार पडला येथे गर्दी करण्यास मनाई करण्यात आली होती. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की करोनाच्या या फटक्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तथापि राज्य सरकारच्यावतीने दहा हजार जणांना नवीन वर्षात सरकारी नोकऱ्या देण्याचा प्रयत्न आम्ही करू अशी ग्वाही त्यांनी दिली.