सुमारे दीड हजार रुपये केले पोलीस निरीक्षकांकडे सुपूर्त
पुणे – हौसेला मोल नसते. वाढदिवस साजरा करण्याची तर मुलांमध्ये क्रेझ असते. ते वाढदिवसाची आवर्जून वाट पाहत असतात. एक मुलगी वाढदिवस साजरा करण्यासाठी वर्षभर पिग्गी बॅंकमध्ये पैसे साठवत होती. तिचा यावर्षी दहावा वाढदिवस होता. मात्र, यावर्षी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तिने साठवलेले सुमारे दीड हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
गीत प्रेमकुमार आगरवाल असे तिचे नाव असून, ती सहायक जिल्हा सरकारी वकील प्रेमकुमार आगरवाल यांची मुलगी आहे. ती पाचवीत शिकत आहे. नुकताच तिचा वाढदिवस झाला. वाढदिवसादिवशी खर्च करण्यासाठी ती वर्षभर पैसे साठवत असते. मात्र, तिने यावर्षी वाढदिवस साजरा करण्याचा मोह टाळून देशात, राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीत ही रक्कम मदत म्हणून देण्याचे ठरविले. मात्र, ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यत निधीला द्यायची तर कशी, असा प्रश्न तिच्यापुढे निर्माण झाला. तिने वडिलांकडे विचारणा केली.
त्यावेळी तिच्या वडिलांनी सुचविले. पोलीस सर्वत्र जनतेची सेवा करत आहेत. त्यांच्याद्वारे ही रक्कम देऊ. त्यानुसार विश्रांतवाडी वाहतुक पोलीस निरीक्षकांकडे ही रक्कम दिली. पोलीस निरीक्षकांनी ही रक्कम स्विकारत तिला वढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी तिने सुरक्षिततेच्या कारणास्तव मास्कही घातला होता.
याविषयी वकील प्रेमकुमार आगरवाल म्हणले, गीत वाढदिवसासाठी दरवर्षी पैसे साठवत असते. तिने दिलेल्या रक्कमेत आणखी पैसे घालून आम्ही तिचा वाढदिवस साजरा करत असतो. मात्र, तिने दाखविलेला समजुतदारपणा पाहून आनंद वाटत आहे.