संयुक्त राष्ट्र – जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेल्या शिफारशीनंतर संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवले आहे. या ऐतिहासिक मतदानानंतर गांजाच्या औषधी व उपचारात्मक क्षमतेची पडताळणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे.
सध्या 50 पेक्षा जास्त देशांनी गांजाचे वैद्यकिय महत्त्व समजून घेत गांजाला वैध ठरवले आहे. कॅनडा, उरूग्वे आणि अमेरिकेच्या 15 राज्यांमध्ये वैद्यकिय कारणासाठी गांजाला परवानगी देण्यात आली आहे.
27 देशांनी गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यासाठी समर्थन दिले, तर उर्वरित देशांनी याविरोधात मतदान केले आहे. भारतानेही गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्याच्या समर्थनार्थ मतदान केले. मात्र, चीन, पाकिस्तान आणि रशिया यासारख्या 25 देशांनी विरोधात मतदान केले.
या ऐतिहासिक मतदानानंतर गांजाच्या औषधी व उपचारात्मक क्षमतेची पडताळणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे. या निर्णयानंतर गांजा किंवा भांगपासून बनलेल्या औषधांचा वापर वाढू शकतो.
याशिवाय गांजाच्या साइंटिफिक रिसर्चसाठीही चालना मिळू शकते. या निर्णयानंतर अनेक देश गांजा किंवा भांगच्या वापराबाबतच्या आपल्या पॉलिसीमध्ये बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.