सत्तेतील नेत्यांनी जिल्हा वार्‍यावर सोडला – माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे

जिल्ह्यातील परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्याचाही दावा

नगर – करोनाच्या संकटकाळात सत्तेतील नेत्यांनी नगर जिल्हा अक्षरश: वार्‍यावर सोडल्याचे चित्र आहे. रेमडेसिविरचा काळाबाजार होत आहे. करोनाबाधित रुग्णांना बेड मिळत नाहीत. काहींचा शासकीय रुग्णालयासमोर मृत्यू होतो. अशावेळी पालकमंत्र्यांना आढावा बैठकीसाठी देखील वेळ मिळत नसल्याबद्दल माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी संताप व्यक्त केला.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर नगर जिल्ह्यातील उपायोजना तसेच वैद्यकीय सुविधांबाबत भाजप नेते, माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना काल निवेदन दिले. त्यांनतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत सत्तेतील नेत्यांवर सडकून टीका केली.

देशातील पहिल्या दहा शहरांत नगरचा समावेश व्हावा, हीच खूप मोठी शोकांतिका आहे. येथील वैद्यकीय यंत्रणा हाताळण्यात नगर जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आहे. आता तर येथील परिस्थिती जिल्हा प्रशासनाच्या आवाक्याबाहेर देखील गेली असल्याचे स्पष्टपणे दिसते. त्यात अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्या अगदीच चिंतानजक असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

करोनाच्या या परिस्थितीमुळे करोनाबाधित रुग्णांचे, त्यांच्या नातेवाईकांचे आणि नगर जिल्ह्यातील जनतेचे देखील प्रचंड हाल सुरु आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनच्या तुटवड्यापेक्षा येथील काळाबाजार करोनाबाधित रुग्णांच्या जीवावर बेतला आहे. करोनाबाधित रुग्णांना ऑक्सीजन बेड उपलब्ध होत नाहीत. साधे बेडही शिल्लक नाहीत. त्यात व्हेंटीलेटर बेडची अवस्था विचारायलाच नको, अशा स्थितीत आहे. केवळ उपचारांअभावी गोरगरिबांचा रस्त्यावर जीव जात आहे. असे असताना पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्ह्यातून बेपत्ता झाल्याचे दिसते. त्यांना नियोजनासाठी आढावा बैठका घेण्यास देखील वेळ मिळत नसल्याची स्थिती आहे.

आमदार रोहित पवार यांच्यावरही प्रा. शिंदे यांनी यावेळी टीका केली महाराष्ट्रात जेवढे लक्ष देण्याचा आव आणतात. तेवढेच लक्ष आपल्या मतदारसंघातही द्यावे. त्यातून करोना आटोक्यात आणता येईल, असा सल्लाही प्रा. राम शिंदे यांनी आमदार पवार यांना दिला.

लसीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील..!
करोना संसर्गापासून बचाव व्हावा, यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून दिलेली आहे. महाराष्ट्रात सुरू असलेले सध्याचे लसीकरण मोदी सरकारचेच योगदान आहे. आताही महाराष्ट्रासाठी अधिक प्रमाणात लस आणि रेमडेसिविरचा पुरवठा व्हावा, यासाठी भाजपच्यावतीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची भूमिका प्रा. शिंदे यांनी यावेळी मांडली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.