खाद्यपदार्थ पाकिटावर देशी नावे असावी : एफएसएसआय

अन्न सुरक्षा यंत्रणेकडून कंपन्यांना सूचना जारी

नवी दिल्ली – खाद्यपदार्थाच्या पाकिटावरील व्होल व्हीट फ्लोर किंवा व्हीट फ्लोर या इंग्रजी नावासोबतच आटा किंवा मैदा असे लिहिणेही बंधनकारक करण्यात आले आहे. इंग्रजी नावामुळे होणारा गोंधळ दूर करण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसआय) सर्व उत्पादकांना हे निर्देश दिले आहेत. यासाठी 30 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

खाद्यपदार्थाच्या वेष्टणावर अनेकदा इंग्रजी भाषेत माहिती दिलेली असते. मात्र, भारतातील बऱ्याच लोकांना या भाषेची फारशी माहिती नसते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या खाद्यपदार्थाची नावे त्यामुळे वेष्टणावर देशांतर्गत भाषेत असण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.

खाद्यपदार्थाच्या पाकिटावर नमूद केलेल्या घटक अन्नपदार्थामध्ये गव्हाच्या पिठाचा किंवा मैदाचा उल्लेख करताना व्होल व्हीट फ्लोर, व्हीट फ्लोर किंवा रिफाईंड व्हीट फ्लोर असे लिहिलेले असते. या इंग्रजी नावांमुळे मात्र यामध्ये नेमक्‍या कोणत्या पदार्थाचा वापर केला आहे, यावरून ग्राहकांचा गोंधळ उडतो. तेव्हा अन्नपदार्थाबाबत योग्य माहिती ग्राहकांना प्राप्त व्हावी या उद्देशाने एफएसएसआयने हा आदेश काढला आहे.

व्होल व्हीट फ्लोरचा वापर केलेल्या अन्नपदार्थाच्या पाकिटावर व्होल व्हीट फ्लोर (आटा)असे नमूद करावे, तर रिफाईंड व्हीट फ्लोरचा वापर केलेल्या पाकिटावर रिफाईंड व्हीट फ्लोर (मैदा) असे लिहावे, असे या आदेशात म्हटले आहे. उत्पादकांना यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत एफएसएसआयने दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.