केंद्रानं बाहेर काढलं NIA ‘अस्त्र’; शेतकरी नेत्यांना घाबरवण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली – बंदी घातलेल्या शिख फॉर जस्टीस या संघटनेची चौकशी करण्यासाठी 40 जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने समन्स बजावले आहे. यात शेतकरी नेते बलदेवसिंग सिरसा, इंग्लंडमधील टीव्ही पत्रकार जसवीरसिंग मुक्तसर, अभिनेता दीप सिधू यांच्यासह एका मिठाई विक्रेत्याचा समावेश आहे. त्यांना एनआयएच्या मुख्यालयात 18 आणि 21 जानेवारीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 160 नुसार ही नोटीस बजावली आहे. शिख फॉर जस्टीस ही संस्था अमेरिकेत कार्यरत आहे. ही संस्था खलीस्तान समर्थकांना मदत करत असल्याने तियच्यावर बंदी घातलेली आहे.

सरकारी अधिकाऱ्यांनी ही नोटीस आणि शेतकऱ्यांच्या निदर्शनामधील सहभाग यांचा परस्पर संबंध नसल्याचे म्हटले आहे. इंग्लंडमधील केटीव्ही या वृत्त वाहिनीचा पत्रकार असणारा जसवीरसिंग मुक्तसर माध्यमांना म्हणाला, मला एनआयएमध्ये 18 तारखेला हजर राहण्यास सांगितले आहे. तेथे मी माझ्या कायदेशीर सल्लागारांसोबत जाणार आहे. मला हे समन्स का बजावले? याची मला कल्पना नाही. या निदर्शनांचे वृत्तांकन करणारा मी पत्रकार आहे.

अन्य एक समन्स बजावलेले रणजीतसिंग म्हणाले, मी आणि अन्य 16-17 तरूण नेत्यांना हे समन्स बजावण्यात आले आहे. शीख फॉर जस्टीसशी आमचा काहीही संबंध नाही. हा आम्हाला चुकीच्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट आहे. आम्ही लंगर चालवण्यासाठी देणग्या घेतल्या आहेत, हे मान्य. पण त्या मित्रांकडून आणि परिचितांकडून घेतल्या अहोत. आम्ही दिल्लीहून गेल्याच आठवड्यात परतलो आहोत.

एनआयएसारख्या तपास यंत्रणेचा वापर करून शेतकरी नेत्यांना धमकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच बरोबरीने एनआयए सारख्या अन्य यंत्रणांचाही वापर करून शेतकरी नेत्यांना नोटीस पाठवण्याचा त्यांचा (सरकार) विचार आहे. आम्ही याचा कडक निषेध करत आहोत, असे शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबिरसिंग बादल यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.