नवी दिल्ली – लोकसभेच्या निवडणूक रणधुमाळीत विविध राजकीय पक्षांना निधी देण्याऱ्या देणगीदारांनी मोठया प्रमाणात निवडणूक रोख्यांची खरेदी केली आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये स्टेट बॅंकेने 3622 कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांची विक्री केल्याचे माहिती अधिकार कायद्यांतर्गत स्पष्ट झाले आहे.
निवडणूक आयोगाने 10 मार्चला लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा केली तसेच 11 एप्रिलपासून देशभरात मतदानाला सुरुवात झाली. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नांद्वारे स्टेट बॅंकेने मार्च 2019 मध्ये 1365.69 कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांची विक्री झाल्याचे सांगितले आहे. तसेच एप्रिलमध्ये यात 65 टक्क्यांची वाढ होत 2256.37 कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री झाली.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून प्रसिद्धीनंतरच हे रोखे खरेदी करण्यात येतात. गेल्या वर्षी निवडणूक रोख्यांची योजना सादर करण्यात आली होती. या रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना देशातील तसेच विदेशातील देणगीदारांकडून निधी मिळविणे शक्य झाले आहे. तसेच या रोख्यांच्या माध्यमातून मिळालेल्या रकमेचा कोणताही हिशेब ठेवणे बंधनकारक नाही.