वॉशिंग्टन – डोनाल्ड ट्रम्प हे निर्विवादपणे अमेरिकेचे आतापर्यंतचे वादग्रस्त अध्यक्ष ठरले आहेत. त्यांनी आपल्या अध्यक्षीय कारकीर्दीत काही वादग्रस्त निर्णय घेतले. तशीच धोरणे राबवली. प्रचंड टीका त्यांच्यावर झाली. मात्र त्या टीकांना त्यांनी भीक घातली नाही.
निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. ते सहजासहजी सत्तेचे हस्तांतर करणार नाहीत अशी भीतीही व्यक्त केली गेली. मात्र ती फोल ठरली. पण आपण पुन्हा येणार अशा आशयाचे सूतोवाच त्यांनी केले होते. त्याचीच हालचाल आता सुरू झाली आहे का, या चर्चांना आता तोंड फुटले आहे.
त्याचे कारण म्हणजे गेल्या सहा महिन्यात ट्रम्प यांच्या समर्थकांनी तब्बल दहा कोटी डॉलर्स देणगी म्हणून दिले असून त्यामुळे ट्रम्प यांची लोकप्रियता वाढत असल्याचे पुरावेच मिळाले आहेत. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत ट्रम्प पुन्हा अध्यक्षपदावर दावा करू शकतात असे मानले जात आहे.
सीएनएनने केलेल्या विश्लेषणानुसार ट्रम्प याना मिळत असलेल्या राजकीय देणग्या आगामी काळात आणखी वाढतील. ट्रम्प यांना ज्या प्रमाणात देणग्या मिळत आहेत त्यावरून कॅपिटल हिंसा प्रकरणाचा ट्रम्प याच्या लोकप्रियतेवर परिणाम झालेला नाही असे दिसून येत आहे. 2024 मध्ये यामुळेच ट्रम्प पुन्हा उमेदवारी जाहीर करू शकतील.
जनमत सर्व्हेक्षणातून मिळालेल्या संकेतानुसार ट्रम्प समर्थकांना ट्रम्प यांचा पराभव म्हणजे निकालात गडबड करून लागलेला निर्णय अशी खात्री वाटते आहे. या समर्थकांना खुश करण्यासाठी ज्या ज्या राज्यात रिपब्लिकन सत्तेत आहेत तेथे नवीन निवडणूक नियम लागू केले गेले आहेत. त्यानुसार अल्पसंख्यांक आणि अश्वेतांना मतदान करणे अवघड झाले आहे.
ट्रम्प समर्थक राजकीय संघेटनेकडे दहा कोटी 20 लाख डॉलर्सचा कोश आहे. त्या जोरावर ते अन्य राज्यातील निवडणूक निकालांवर प्रभाव पाडू शकतात असे मानले जात आहे. सध्याचे अध्यक्ष ज्यो बायडेन याच्यापुढे ट्रम्प यांचे मोठेच आव्हान असेल असे म्हटले जात आहे.