रांची – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी कॅप्टन कुल म्हणुन सुपरिचीत आहे. मात्र, आता त्याला कोणी निवृत्तीबाबत विचारले की त्याचा पारा चढतो. खुद्द धोनीच्या मित्र-मंडळींनीच ही बाब जाहीर केली आहे.
धोनीकडे जेव्हापासून भारतीय संघाचे नेतृत्व आले तेव्हापासूनच मैदानावर अत्यंत शांत व संतुलीत राहणारा कर्णधार अशी त्याची ख्याती निर्माण झाली होती. सामन्यात कोणतीही स्थिती असो धोनीचा तोल गेल्याचे कधीच दिसले नाही. उलट विपरीत परिस्थितीवरही त्याने आपल्या नेतृृत्वाच्या जोरावर यशस्वीपणे मात केली हेच दिसून आले आहे. मात्र, आता आयपीएल होणार का याबाबत संभ्रम वाढल्याने धोनीसमोर भारतीय संघात पुनरागमन कसे करायचे हा यशप्रश्न उभा राहिला असल्याने कधी कधी त्याचाही तोल जात असल्याचे दिसून येत आहे. भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार अशी खरेतर धोनीची ओळख पण सध्या त्याला त्याच्या मित्रांनी जरी चेष्टेत निवृत्तीबाबत विचारले की त्याचे पित्त खवळते.
गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य लढतीत भारतीय संघाचा पराभव झाला होता. त्यानंतर पुढील 8 महिने धोनीने विश्रांती घेतली होती. तो संघात परतणार का निवृत्ती घेणार या चर्चेने भारतीय क्रिकेटमध्ये राळ उडविली होती. अखेर धोनीने आयपीएल खेळणार असल्याचे सांगुन या चर्चांना पूर्णविराम दिला होता. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि निवड समितीने त्याला आयपीएलमध्ये कामगिरी सिद्ध कर तसेच तंदुरुस्ती सिद्ध कर तरच संघ निवडीत तुझा विचार केला जाईल असे स्पष्ट केले होते.
त्यानुसार धोनी चेन्नई सुपरकिंग संघाच्या सराव शिबिरात दाखल झाला होता. त्याने सरावाला प्रारंभही केला होता, मात्र त्याचवेळी करोनाचा धोका निर्माण झाला आणि हे सराव शिबिर थांबवावे लागले व धोनी रांचीला परतला. धोनी आपल्या तंदुरुस्तीवर खूपच मेहनत घेत असल्याचे त्याच्या जिममधील छायाचित्रांमुळे दिसत आहे, मात्र आता आयपीएल होणार का आणि कधी होणार याबाबत संभ्रम असल्याने सध्यातरी धोनीकडे वाट पाहण्याशिवाय कोणताही उपाय नाही. यापूर्वी कोणतेही दडपण न घेणारा हा कर्णधार सध्या खूपच तणावाखाली असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातूनच त्याची चीडचीड होत असून तो निवृत्तीच्या प्रश्नावर आपल्या मित्रांवरच रागावत आहे, असे खुद्द त्याच्या मित्रांनीच व्यक्त केले आहे.
सध्या सोशल मीडियावर धोनीच्या जिममधील व्यायामाचे व्हिडीओ व्हायरल होत असून त्यातही त्याच्या देहबोलीतून नाराजी स्पष्ट जिसून येत आहे. व्यायामादरम्यान तो जिममधील ट्रेनरशी देखील संवाद साधत नसून केवळ आपल्या वर्कआउटवर लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसत आहे. धोनीला आता भारतीय संघात पुनरागमन करायचे आहे, हे यावरून स्पष्ट दिसत आहे. धोनीला पुनरागमन करण्यासाठी आयपीएल सर्वात उत्तम माध्यम होते. यंदाची आयपीएल होणार नसल्याचे चित्र दिसत असल्याने धोनीची कारकिर्द संपुष्टात आली, असे मतही माजी खेळाडूंनी व्यक्त केले आहे.