पिंपरी : न्याय कोणाकडे मागायचा? वृद्ध दाम्पत्यास पोलिसांकडून मारहाण; पोलीस आयुक्‍तांनीही नाकारली ‘भेट’

पिंपरी – जावई आणि सासऱ्याचे भांडण पोलीस ठाण्यापर्यंत गेले. पोलिसांनी बाहेरील भांडण मिटविण्यासाठी त्यांना पोलीस ठाण्यात नेले. तिथे ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला पोलिसांनी अश्‍लिल शिवीगाळ करीत मारहाणही केली. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्याला तर त्यांच्या पत्नीच्या कानाला गंभीर दुखापत झाली. पोलिसांची तक्रार करण्यासाठी आयुक्‍तालयात गेल्यावर तिथेही आयुक्‍तांच्या आदेशावरून कर्मचाऱ्यांनी आयुक्‍तांची भेट घेण्यास मज्जाव केला. त्यामुळे आम्ही न्याय मागायचा तरी कोणाकडे, असा सवाल त्या ज्येष्ठ नागरिकांनी केला आहे.

कुमार लक्ष्मण फुगे आणि त्यांची पत्नी अलका (दोघेही रा. भोसरी) अशी पोलिसांनी केलेल्या मारहाणीत गंभीर दुखापत झालेलया ज्येष्ठ दाम्पत्याचे नाव आहे. 17 फेब्रुवारी रोजी स्पाइन रोड, मोशी येथे राहणाऱ्या फुगे यांच्या मुलीचे तिच्या पतीशी भांडण झाले. तुमच्या मुलीला घेऊन जा, असे जावई सांगत होता. मात्र माझा आयुष्यभर सांभाळ करणार का, असा प्रश्‍न मुलगी फुगे यांना विचारत होती. जावयाने त्यांना पोलीस ठाण्यासमोरील सर्कलजवळ बोलावले.

यामुळे फुगे दाम्पत्य तिथे गेले. तिथे गेल्यावर सासरे फुगे आणि जावयामध्ये रस्त्यावरच भांडण झाले. समोर असलेल्या पोलिसांनी जावई आणि फुगे दाम्पत्याला भांडण मिटविण्यासाठी पोलीस ठाण्यात नेले. तिथे अश्‍लिल शिवीगाळ करीत पोलिसांनी फुगे दाम्पत्याला मारहाण केली. या मारहाणीत कुमार फुगे यांच्या डोळ्याला तर अलका यांच्या कानाच्या पडद्याला गंभीर दुखापत झाली. तसेच दोघांच्याही अंगावर पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे व्रण तीन दिवसानंतरही कायम असल्याचे फुगे दांपत्याने दै. “प्रभात’शी बोलताना सांगितले.

पोलिसांनी केलेल्या मारहाणीबाबत तक्रार करण्यासाठी फुगे दाम्पत्य शनिवारी (दि. 20) पोलीस आयुक्‍तालयात आले. मात्र स्वागत कक्षात असलेल्या कर्मचाऱ्यांनी पोलीस आयुक्‍तांची भेट देण्यास नकार दिला. तुम्ही एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार करा, असा सल्लाही आयुक्‍तालयातील कर्मचाऱ्यांनी दाम्पत्याला दिला. ज्यांनी मारहाण केली त्यांच्याकडेच तक्रार कशी करणार, असा सवाल फुगे दाम्पत्याने केला.

पोलीस आयुक्‍तांनी आपल्या कामातून समाजातून वाहवा मिळविली. मात्र पोलीस आयुक्‍तांनी नागरिकांसाठी दिलेल्या वेळेतही येथील कर्मचारी त्यांना भेटून देत नाहीत. मग भेटण्याची वेळ जाहीर केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी केली आहे का, पोलीस आयुक्‍त फक्‍त अलिशान मोटारीतून पुष्पगुच्छ आणलेल्या नागरिकांचीच भेट घेताता का, असा सवालही फुगे दाम्पत्याने केला आहे. डोळ्याची आणि कानाची जखमी उतारवयात झालेली जखम कदाचित बरी होईलही. मात्र पोलिसांनी केलेली शिवीगाळ आणि मारहाणीमुळे मनाला झालेली जखम कशी भरून येणार, असा सवालही त्यांनी केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.