नवी दिल्ली – भारत आणि इंग्लंड यांच्यात बुधवारी वनडे मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारताने 66 धावांनी इंग्लंडवर विजय मिळवला. त्याचबरोबर या सामन्यात पदार्पण करणाऱ्या प्रसिद्ध आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याने शानदार गोलंदाजी करताना एक मोठा विक्रम रचला आहे.
पहिल्या वनडे प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून शिखर धवनने सर्वाधिक 98(106) धावांची शानदार खेळी साकारली. त्याचबरोबर विराट कोहली, केएल राहुल आणि क्रुणाल पंड्या या प्रत्येकांनी अर्धशतकी खेळी साकारली. त्यामुळे भारतीय संघाने 317 धावांचा डोंगर उभारला.
दरम्यान 318 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणार्या इंग्लंडची पहिल्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी झाली होती.
मात्र भारतासाठी कर्दनकाळ ठरत असलेली ही सलामी जोडी प्रसिद्ध कृष्णाने फोडली. त्याने जेसन रॉयला बाद करत आपली आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिली विकेट मिळवली. त्याचबरोबर बेन स्टोक्स, टॉम करन आणि बिलिंगस यांना बाद करत आपल्या 4 विकेट्स पूर्ण केल्या. त्यामुळे प्रसिद्ध कृष्णा हा वनडे सामन्यात पदार्पण करताना सर्वाधिक 4 विकेट्स घेणारा भारताचा पहिला गोलंदाज ठरला. त्याने ही कामगिरी करताना नोएल डेविडचा विक्रम मोडीत काढला.
वनडे सामन्याच्या पदार्पणात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
वनडे क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम प्रसिद्ध कृष्णाच्या नावावर झाला आहे. त्याच्या अगोदर हा विक्रम नोएल डेविडच्या नावावर होता. त्याने 1997 साली वेस्ट इंडिज विरुद्ध पदार्पणाचा सामना खेळताना 21 धावांत 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर भारताकडून यापूर्वी पदार्पणात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम वरून ऐराॅनच्या नावावर होता. त्याने 2011 साली मुंबईत इंग्लंड विरुद्ध खेळताना 3(24)विकेट्स घेतल्या होत्या.