नवी दिल्ली – इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर चौथ्या टी-20 सामन्यात 4 विकेट्स घेतल्या. मात्र तरी ही या सामन्यात इंग्लंड संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता या टी-20 मालिकेतील शेवटचा टी-20 सामना शनिवारी खेळला जाणार आहे. त्यानंतर वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे.
तत्पूर्वी आता अशी माहिती समोर येत आहे की, वनडे मालिकेत जोफ्रा आर्चरला विश्रांती दिली जाऊ शकते. या अगोदर चौथ्या कसोटी सामन्यात आर्चरला विश्रांती दिली होती. मात्र तेव्हा दुखापतीमुळे त्याला विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर तो टी-20 मालिकेत सहभागी होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह होते, परंतु टी-20 मालिकेच्या पूर्वी तो फिट झाला आणि सहभागी झाला.
Jofra Archer has his best ever T20I figures with his first four-for today 👊#INDvENG
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 18, 2021
जास्तीच्या वर्कलोड म्हणून दिली जाऊ शकते विश्रांती
जोफ्रा आर्चर आतापर्यंत टी-20 मालिकेत खेळलेल्या कोणत्याही सामन्यात दुखापत झालेली नाही. मात्र टीम मॅनेजमेंटला त्याच्यावर जास्त वर्कलोड लादायचा नाही. त्यानुसार वनडे मालिकेसाठी आर्चरला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यंदा टी-20 विश्वचषक आणि अॅशेस मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंटला आर्चरच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायचा विचार नाही.
जर आर्चरला विश्रांती दिली गेली, तर इतर वेगवान गोलंदाजांना खेळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे भारतीय वातावरणात खेळण्याचा त्यांचा सराव होईल. कारण टी-20 विश्वचषक हा भारतात आयोजित केला जाणार आहे. म्हणून हे महत्वाचे ठरू शकते.
वनडे मालिकेसाठी इंग्लंडने अजून आपला संघ घोषित केला नाही. मात्र भारतीय संघाने 18 सदस्यीय वनडे संघाची घोषणा शुक्रवारी(19 मार्च) केली आहे. वनडे मालिकेतील तीन ही सामने पुण्यात खेळवले जाणार आहे आणि याची सुरुवात 23 मार्च पासून होणार आहे.