Vaccine Price | कोव्हॅक्‍सिन लसीची किंमत बदलली; आता ‘एवढ्या’ रुपयांना मिळणार

नवी दिल्ली, दि.29 – कोविशिल्ड पाठोपाठ कोव्हॅक्‍सिन ही करोनावरील लसही स्वस्त झाली आहे. आता कोव्हॅक्‍सिन राज्यांना 400 रूपयांत म्हणजे 200 रूपयांनी स्वस्तात उपलब्ध होणार आहे.

भारत बायोटेक या कंपनीने गुरूवारी कोव्हॅक्‍सिनच्या राज्यांसाठीच्या दरात कपात केली. याआधी तो दर लसीच्या प्रत्येक डोससाठी 600 रूपये इतका होता. देशात सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्‍सिन या लसी उपलब्ध आहेत. त्यांच्या दरांची घोषणा संबंधित कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी केली. त्यानुसार, कोविशिल्डचा दर राज्यांसाठी 400 रूपये, तर खासगी रूग्णालयांसाठी 600 रूपये निश्‍चित करण्यात आला.

कोव्हॅक्‍सिनबाबत ते दर अनुक्रमे 600 रूपये आणि 1 हजार 200 रूपये ठेवण्यात आले. त्या दरांवरून वादंग निर्माण झाले. ते केंद्र सरकारसाठी निश्‍चित करण्यात आलेल्या दरापेक्षा (150 रूपये) कितीतरी अधिक असल्याची टीका करण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकारने लसींच्या किमती कमी करण्याची सूचना उत्पादकांना केली.

त्यापार्श्‍वभूमीवर, सीरम इन्स्टिट्यूटने बुधवारी राज्यांसाठी कोविशिल्डच्या दरात 100 रूपयांची कपात केली. आता ती लस राज्यांना 300 रूपयांत उपलब्ध होईल. सीरमपाठोपाठ भारत बायोटेकनेही राज्यांसाठी दरकपातीची घोषणा केली. अर्थात, दोन्ही लसींचे खासगी रूग्णालयांसाठीचे दर बदललेले नाहीत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.