जीनिव्हा/बीजिंग – चीनच्या वैज्ञानिकांनी वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीमध्ये करोना विषाणू तयार केला असल्याचा दावा पुन्हा एका अभ्यासाद्वारे करण्यात आला आहे.
चिनी वैज्ञानिकांनी विषाणू तयार केल्यानंतर त्याला रिव्हर्स-इंजिनिअरिंग व्हर्जनमध्ये बदलण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून हा विषाणू वटवाघळापासून आल्याचा जगाचा समज होईल. मात्र, त्यांचे हे कारस्थान अपयशी ठरले आहे असा आरोप दोन संशोधकांनी केला आहे.
त्यांच्या या दाव्यामुळे करोनाचे उत्पत्तीस्थळ शोधण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अमेरिकेला पुन्हा बळ मिळणार असून चीनचा मात्र या प्रकारात थयथयाट होणार आहे.
करोनाच्या विषाणूच्या संदर्भातील हा अभ्यास ब्रिटिश प्राध्यापक अँगस डल्गलिश आणि नॉवेचे वैज्ञानिक डॉ. बिर्गर सरेनसेन यांनी केला आहे.
या अभ्यासात त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्याकडे एक वर्षापासून चीनमध्येच कोविड-19 विषाणूवर रेट्रो-इंजिनिअरिंग सुरू असल्याचे पुरावे आहेत. मात्र, अनेक वृत्तसंस्थांनी याकडे दुर्लक्ष केले. प्रोफेसर डल्गलिश हे लंडनमध्ये सेंट जॉर्ज विद्यापीठात कॅन्सर विज्ञानाचे प्राध्यापक आहेत. तर डॉ. सरेनसेन हे एक व्हायरॉलॉजिस्ट आणि इम्युनॉर या कंपनीचे अध्यक्ष आहेत.
ही कंपनी करोनावरील व्हॅक्सिन तयार करत आहे.
चीनच्या वुहानमधील लॅबमध्ये जाणीवपूर्वक डाटा नष्ट करण्यात आला. तो लपवण्यात आला किंवा गायब करण्याचा प्रयत्न केला गेला. ज्या वैज्ञानिकांनी याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्यांनाही गायब करण्यात आले.
डल्गलिश आणि सरेनसेन लस बनवण्यासाठी करोना सॅम्पलचा अभ्यास करत होते. तेव्हा त्यांनी विषाणूमध्ये एक खास फिंगरप्रिंट शोधून काढला. हा प्रकार लॅबमध्ये व्हायरससोबत काही छेडछाड केल्यासच संभव असल्याचे त्यांचे मत आहे. या दोन्ही अभ्यासकांनी ही बाब जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.