मुंबई – राज्यात गेल्या 24 तासांत आठ हजार 333 करोनाबाधित आढळले. त्या पाठोपाठ केरळमध्ये तीन हजार 671 बाधित आढळले. महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक आहे. राज्यातील 36 पैकी 27 जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यात मोठी वाढ पहायला मिळत आहे. त्यातील 21 जिल्ह्यात 10 दिवसांत परिस्थिती चिंताजनक बनली आहे. लातूर, हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात मोठ्या संख्येने सक्रिय बाधित वाढत आहेत.
देशांत सध्या एक लाख 59 हजार 590 सक्रिय बाधित आहेत. एकूण बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण 1.44 टक्के आहे. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, तमिळनाडू आणि गुजरात या सहा राज्यांत गेल्या 24 तासांत मोठी वाढ पहायला मिळत आहे, याकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लक्ष वेधले आहे.
देशांत गेल्या 24 तासांत 16 हजार 488 नव्या बाधितांची नोंद झाली. त्यातील 85. 75 टक्के सहा राज्यांत आहेत तर अन्य आठ राज्यांत करोना बाधितांची संख्या वाढत आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तिसगढ, मध्यप्रदेश, गुजरात, पंजाब, प. बंगाल आणि जम्मू काश्मिर येथे करोनाच्या बाधितांच्या संख्येत होणाऱ्या वाढीचा मंत्रीमंडळ सचिवांनी आढावा घेतला. या राज्यांनी करोनाच्या वाढत्या संख्येमुळे खचून जाऊ नये. निर्बंधांचे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.
संभाव्य सुपर स्प्रेडर शोधण्यासाठी प्रभावी पाहणी आणि मागोवा घेण्याची योजना राबवावी. चाचण्या तातडीने घ्याव्यात. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावे, करोना बाधितांचे विलगीकरण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.