लंडन – करोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. काही जणांवर लशीचे किरकोळ दुष्परिणाम दिसून आले आहेत. ब्रिटनमध्येही लस घेतल्यानंतर साइड़ इफेक्ट्स झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनकाच्या लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर अधिक साइड इफेक्ट्स होत असल्याची माहिती समोर आली आहे.
ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाची लस घेणाऱ्या 10 जणांपैकी तीन जणांना साइड इफेक्ट्सचा त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे. या लशीच्या तुलनेत फायजरने विकसित केलेल्या लशीच्या दुसऱ्या डोसनंतर नागरिकांत साइड-इफेक्ट्सचे प्रमाण कमी असल्याचे समोर आले आहे. ब्रिटनमध्ये या दोन्हीही लस दिल्या जातात.
एका अहवालानुसार, ब्रिटनमधील 30 टक्के जणांनी ऑक्सफर्ड-एस्ट्राजनेकाची लस घतेली. त्यांनतर त्यांच्यात थकवा, डोकेदुखी, ताप येणे अशी लक्षणे आढळली आहेत. ऑक्सफर्ड-एस्ट्राजनेकाच्या तुलनेत फायजरची लस घेतल्यानंतर 15 टक्के लोकांनी साइड इफेक्ट्स जाणवल्याची माहिती दिली आहे.
लंडनच्या अभ्यासकांनी म्हटले आहे की, लस घेतल्यानंतर सौम्य स्वरूपाचे साइड इफेक्टस् जाणवत असले तरी, लोकांनी लस घेतली पाहीजे. लशीमुळे करोनापासून बचाव होणे शक्य आहे. तसेच लस यशस्वी ठरत असल्याचेही सांगितले आहे.