हॉंगकॉंग – एक्स्पायरी डेट जवळ आल्यावरही वापराविना पडून असलेल्या हजारो लसी अखेर कचराकुंडीत फेकून देण्याची वेळ हॉंगकॉंगमध्ये आली आहे. मंगळवारी तेथील अधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. अनेक देशांना लसींची कमतरता भासते आहे, तर बऱ्याच देशांत अद्याप लसच पोहोचली नाही.
अशा स्थितीत काही देश जर लसी जाळत असतील किंवा कचरापेटीत टाकत असतील तर हा विरोधाभास करोनाला पराभूत करण्यासाठी नक्कीच जाचदायक ठरणार असल्यावर शिक्कामोर्तब होते आहे.
हॉंगकॉंगमध्ये लोक ही लस घेण्यासाठी नोंदणीच करत नसल्याचे तेथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हॉंगकॉंग हा असा देश आहे, जेथे गरजेपेक्षा जास्त लस उपलब्ध आहे. येथील लोकसंख्या सुमारे 75 लाख आहे.
त्यांच्याकडे उपलब्ध असलेली लस पुढील तीन महिन्यांतच वापरली जाऊ शकते, असा इशारा सरकारच्या टास्क फोर्सच्या सदस्याने दिला आहे. यानंतर या लसी खराब होतील. या शहरात फायझर-बायोएनटेक लसीची पहिली तुकडी आता एक्सपायर होणार आहे.
सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनचे पूर्व कंट्रोलर थॉमस सॉंग म्हणाले की, सध्या जगभरात लसींची कमतरता आहे आणि अशा परिस्थितीत असे होणार नाही की, आम्ही ही लस विकत घेऊ आणि त्यानंतर फेकून देऊ. मात्र लसींची मुदत संपण्याच्या आत ते लसीकरण कसे करणार याचा कोणताही प्लॅन त्यांच्याकडे नसल्याचे सध्यातरी चित्र आहे.
आतापर्यंत, हॉंगकॉंगमधील केवळ 19 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे, तर 14 टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. इथले आरोग्य कर्मचारी लस घेण्यासही टाळाटाळ करत आहेत. फायझरची लस अत्यंत कमी तापमानात ठेवावी लागते आणि ती सहा महिन्यांत खराब होते.