कर्नाटकातही लसीकरण लांबणार

बंगळुरू, दि. 30 – कर्नाटकातही 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे काम लसीअभावी लांबण्याची शक्‍यता आहे. 1 मेपासून हे काम सुरू होणार होते. कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुबोधकुमार यांनी सांगितले की, राज्याकडे लसीचा पुरवठा अजून झालेला नाही.

आम्हीही सीरमकडे एक कोटी लसीचे डोस नोंदवले आहेत. ही लस उद्यापासून आम्हाला मिळणे अपेक्षित होते; पण त्यांच्याकडून अजून कोणताही साठा आलेला नाही. ज्यांनी 1 मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी नाव रजिस्टर केले आहे, त्यांनी यासाठी लसीकरण केंद्रावर जाणे टाळावे, असे आवाहन राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

सीरमकडून कन्फर्मेशन आल्यानंतर आम्ही नाव नोंदवलेल्या व्यक्‍तींना याबाबत माहिती देऊ. त्यानंतरच त्यांनी या केंद्रावर जावे, असे त्यांनी म्हटले आहे. एक कोटी डोससाठी आम्ही या आधीच सीरम संस्थेला चारशे कोटी रुपये दिले आहेत, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. भारतात दोनच लस उत्पादक कंपन्या आहेत.

त्यातील सीरम संस्थेची क्षमता महिन्याला पाच ते सहा कोटी डोस तयार करण्याची आहे, तर भारत बायोटेक ही कंपनी महिन्याला दीड कोटी लस तयार करू शकते. भारतातील डॉ. रेड्डीज लॅबरोटरीला रशियाच्या स्पुटिनिकने लस तयार करण्याचा परवाना दिला असला तरी त्यांच्याकडून प्रत्यक्ष उत्पादन कधी सुरू होईल, याविषयी त्यांनी भारत सरकारला अजून काहीच कळवलेले नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.