…आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केले ‘कन्यादान’

देवरिया – आपल्याकडे अधिकारी कायम चर्चेत असतात. एकतर कामचुकारपणामुळे किंवा भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांच्याबद्दल चर्चा होत असते. राजकारणातील काही खास लोकांची मर्जी सांभाळण्यातच धन्यता मानत असल्यामुळेही काही अधिकारी चर्चेत असतात.

त्यांच्याबद्दल बोलले जाते व टीकाही होते. मात्र असले फुटकळ अधिकारी तेवढ्यापुरतेच लक्षात राहतात आणि कायमचे विस्मृतीतही चालले जातात. मात्र काही अधिकारी याला अपवाद असतात.

वरमाला स्टेज पर नव दंपती।

हे अधिकारी आपल्या वेगळेपणामुळे, साधेपणामुळे, कर्तव्यनिष्ठेमुळे आणि विकासाच्या ध्यासामुळेही आपली जनमानसात एक स्वतंत्र प्रतिमा तयार करतात. काही अधिकारी अधिकाराची वस्त्रे परिधान केल्यानंतरही मनाच्या एखाद्या कोपऱ्यात संवेदनशीलता जपून ठेवतो. माणुसकीला धरून असतो आणि त्याच्या जॉब प्रोफाइलमध्ये नसतानाही वेगळ्या वाटेने जात आपले वेगळेपण सिध्द करतो. त्यामुळे लोकांच्या कौतुकाला आणि प्रशंसेला ते पात्र ठरतात.

असेच एक वेगळे उदाहरण किंवा आदर्श उत्तर प्रदेशातील देवरियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिला आहे. गोष्ट तशी छोटीशीच आहे, मात्र आहे हृदयस्पर्शी. त्यामुळे जिल्हाधिकारी अमित किशोर विशेष चर्चेचा विषय ठरले आहेत. सालेमपूरचे अजय कुमार रावत हे भारताच्या सीमा सुरक्षा दलात अर्थात बीएसएफमध्ये कॉन्स्टेबल होते. जम्मू काश्‍मीरमध्ये ते कर्तव्यावर तैनात होते. 25 ऑगस्ट 2018 रोजी त्यांचा एका दुर्घटनेत मृत्यू झाला. देशाची सेवा करत असताना ते हुतात्मा झाले.

रावत यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले आणि मुलगी असा परिवार. यातल्या मुलीचे अर्थात शिवानीचे लग्न ठरले. पिता कन्यादान करतो. पिता नसेल तर मोठा भाउ ते कार्य करतो. मात्र शिवानीची इच्छा वेगळीच होती. तिने थेट अमित किशोर यांना अत्यंत भावूक पत्र पाठवले. अमित किशोर यांनीच आपले कन्यादान करावे अशी विनंती तिने केली.

माझ्या पित्याचे अंत्यसंस्कार आपल्याच हातून झालेत. आता माझा विवाह आहे. कन्यादानही आपणच करावे असे शिवानीने पत्रात म्हटले होते. अमित किशोर यांनी ते पत्र वाचले आणि सहकुटुंब ते शिवानीच्या विवाहाला हजर राहीले. त्यांनी तिची इच्छा पूर्ण केली आणि वडिलकीच्या नात्याने दिला भेटवस्तूही दिली.

थेट जिल्हाधिकारी कन्यादान करण्यासाठी आल्यावर रावत कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला. याबाबत अमित किशोर म्हणाले की, आपल्या जिल्ह्यात लष्कराचे, निमलष्करी दलाचे, वायुसेनेचे जेवढे अधिकारी आहेत, त्यांच्या जिवनात अथवा त्यांच्या कुटुंबियांच्या आयुष्यात जर कोणती समस्या आली तर ती आम्ही प्राधान्याने सोडवली पाहिजे अशी जिल्हाधिकाऱ्यांकडून अपेक्षा असते.

शिवानीने पत्रात कन्यादान करण्यासाठी येण्याची विनंती केली होती. तिचे पत्र वाचल्यावर माझ्याकडे राहावले गेले नाही. पत्नीसह मी तिच्या लग्नाला उपस्थित राहीलो.
जिल्हाधिकाऱ्यांचे हेच कर्तव्य असते. भविष्यात जर पुन्हा अशा कर्तव्य पालनाची आवश्‍यकता भासली तर त्याचेही निर्वहन मी आनंदाने करेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.