-->

BIG NEWS : राज्यात लॉकडाऊन होणार का? मुख्यमंत्र्यांनी दिला 8 दिवसाचा ‘अल्टिमेटम’

मुंबई – राज्यात करोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता पुन्हा लॉकडाऊन होणार काय असा प्रश्‍न सर्वत्र विचारला जात आहे. त्या संबंधात आज स्वता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच स्पष्टीकरण दिले असून त्यांनी म्हटले आहे की नागरीकांनीच करोनाच्या संबंधातील निर्बंध काटेकोरपणे पाळावेत. नागरीकांच्या प्रतिसादाचा पुढील आठ दिवस अभ्यास करून लॉकडाऊन विषयीचा निर्णय घेतला जाईल असे त्यांनी म्हटले आहे.

ज्यांना लॉकडाऊन नको असेल त्यांनी सतत मास्क घालून फिरले पाहिजे. आणि ज्यांना लॉकडाऊन हवा असेल त्यांनी मास्क न घालता फिरावे. त्यावरून मी माहिती घेऊन पुढील निर्णय घेईन असे ते म्हणाले. लॉकडाऊन कोणालाच नको आहे. पण नागरीकांच्या वर्तवणुकीत सुधारणा झाली नाही तर त्या खेरीज पर्याय राहणार नाही असे ते म्हणाले.

राज्यातील करोनाचे प्रमाण पुन्हा लक्षणीयरित्या वाढत आहे ही काळजीची बाब आहे असे ते म्हणाले. त्यामुळे हे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी यापुढील काळात सार्वजनिक स्वरूपातील राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. गर्दीच्या आंदोलनालाही राज्यांत बंदी असेल असे ते म्हणाले.

सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी आज हे संबोधन केले. त्यांनी करोनाच्या वाढत्या स्थितीचीही जनतेला सविस्तर कल्पना देऊन राज्यातील संभाव लाटेविषयी लोकांना सावधगिरीचा इशारा दिला.

मधल्या काळात करोना रूग्णांची संख्या पुर्ण नियंत्रणात आली होती पण आता पुन्हा रूग्णांची संख्या दुपटीहून वाढली आहे. आपण सावधगिरीच्या उपाययोजना पाळल्या नाहीत तर हे प्रमाण असेच वाढत राहणार आहे असे ते म्हणाले. ज्यांना शक्‍य असेल त्यांनी पुन्हा वर्क फ्रॉम होम सुरू करा. कार्यालयांच्या वेळांची विभागणी करा अशा सुचनाहीं त्यांनी केल्या.

ते वरच्यांच्या हातात !
राज्यात नऊ लाख फ्रंट लाईन वर्कर्सना लस देण्याची प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. आता बाकीचे लोक विचारत आहेत की आम्हाला लस कधी मिळणार? पण ही बाब मात्र वरच्यांच्या हातात आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. वरच्यांच्या म्हणजे केंद्र सरकारच्या हातात ही बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशात आता आणखी एकदोन कंपन्या ही लस उपलब्ध करून देणार आहेत. केंद्र सरकार जसा निर्णय घेईल त्यानुसार नागरीकांना ही लस उपलब्ध करून दिली जाईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.