शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला; उद्धव ठाकरे यांनी वाहनातून खाली उतरून…

चंद्रपूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ब्रम्हपुरी येथे घोडझरी प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आले असता शेतकरी व प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्री यांच्या वाहनांचा ताफा अडविला. यावेळी शेतकऱ्यांनी 15 वर्षांपासून आम्हाला एक थेंब पाणी मिळाले नाही, मोबदला मिळाला नाही अशी व्यथा मांडली. तेव्हा मुख्यमंत्री ठाकरे यांनी वाहतातून खाली उतरून शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसेच याबाबत माहिती घेतो आणि सर्व कामे मार्गी लावतो, असे आश्वासन दिले.

उद्धव ठाकरे यांनी आज पवनी व ब्रम्हपुरी येथे गोसीखुर्द प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव अजय मेहता यांच्यासहित अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांनी ब्रम्हपुरी येथे घोडाझरी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याजवळच बैठक घेवून प्रकल्पाविषयीची माहिती जाणून घेतली. तसेच गोसीखुर्द प्रकल्पाच्या निर्मितीपासून आजपर्यंत झालेली कामं, या प्रकल्पामुळे विकसित होणारी सिंचन क्षमता याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेतली.

त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेवून गोसीखुर्द प्रकल्प यापुढे न रखडता सर्व घटकांच्या सहकार्याने डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण झाला पाहिजे यासाठी आवश्‍यक असलेल्या निधीचे नियोजन करावे. हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करून विदर्भातील जनतेला सिंचनासाठी मोठा लाभ मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.