विदर्भवासीयांना वचन देतो की तुमच्यावर अन्याय होणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागपूर/मुंबई – देशात सध्या केंद्रीकरण सुरू आहे, सर्वच आपल्या हातात हवे असे सुरू आहे. असे असताना आपण मात्र राज्यात प्रशासनाचे विकेंद्रीकरण करत आहोत. शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करणे हे आपण तळमळीने घेतले आहे. विदर्भवासीयांना वचन देतो की तुमच्यावर अन्याय होणार नाही, अन्याय कोणी करत असेल तर ढाल बनून उभे राहू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

नागपूर येथील विधानभवनात विधानमंडळ सचिवालयाचा कायमस्वरुपी कक्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज उद्‌घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. देशाच्या नकाशावर भौगोलिकदृष्टया नागपूरचे स्थान केंद्रस्थानी आहे. वर्षातील 3 अधिवेशनांपैकी 1 अधिवेशन उप राजधानी नागपूरमध्ये घेण्याची महाराष्ट्राची, नागपूर करारानुसार सुरू झालेली परंपरा, संसदीय लोकशाहीत वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. त्यामुळे नागपुरात आता विधानभवनात वर्षभर गजबजाट असणार आहे.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राचे 60 वे वर्ष आहे. आपण गेल्या वर्षी 1 मे महाराष्ट्र स्थापना दिन म्हणून मोठे करणार होतो, पण करोना आला. विदर्भ हा महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे. आता अभिमान आहे की प्रतिकूल काळात ही इथे कायमस्वरुपी कक्ष निर्माण होतोय. विकास हा विधान भवनातून होत असतो. कारण नसताना मुंबईला करावी लागणारी ये-जा या कक्षामुळे बंद होणार आहे, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विदर्भाचा सर्वांगीण विकास व्हावा ह्यात दुमत नाही. इथे चांगले अधिकारी दिले पाहिजेत. ज्या अधिकाऱ्यांना नागपुरात जायचे आहे अश्‍या अधिकाऱ्याला इथे पाठवा, असा सल्ला त्यांनी दिला.

यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लोकशाहीवर विश्वास ठेवणारी मंडळी आली आणि आज अनेकांना थेट विधानसभेत बसायला मिळाले. ही ऐतिहासिक इमारत आहे. आम्ही विदर्भावर अन्याय होतोय हे सतत ऐकत होतो. विधानसभा अध्यक्ष होताच आपल्याला विदर्भासाठी काय करता येईल हा विचार होता. विधानभवनाची अद्यावत लायब्रेरी ही मुलामुलींना कशी उघडता येईल ह्यावर विचार सुरू आहे, असेही पटोले म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.