बीजिंग – करोनाचा फैलाव नेमका कसा झाला, याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची टीम चीनमध्ये पोहोचली. परंतु या टीमच्या कामात अडथळे आणायला चीनने सुरूवात केली असल्याच्याही बातम्या आहेत.
जगभरात आतापर्यंत तब्बल साडे 19 लाख लोकांचे बळी घेणाऱ्या करोनाचा व्हायरस नेमका कसा आणि कुठून जन्माला आला, याचा शोध घेण्यास जागतिक आरोग्य संघटनेनं सुरूवात केलीय. मात्र चीनने आरोग्य संघटनेची टीम येण्याच्या एक दिवस आधी वुहानमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला. चीनमध्ये कोरोनाचे 115 नवे रुग्ण आढळल्याने हा निर्णय घेतल्याचा दावा चीनने केला आहे. या पार्श्वभूमीवर टीम गुरुवारी वुहान शहरात पोहोचली.
मात्र या टीमपैकी 2 शास्त्रज्ञांना चीनने एन्ट्री नाकारली. या दोघांमध्ये करोनाची लक्षणं आढळल्यानं त्यांना तूर्तास सिंगापूरमध्येच राहावं लागणार आहे. तर उर्वरित 13 शास्त्रज्ञांना वुहानमध्ये 14 दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे. एवढंच नव्हे तर वुहान इन्स्टिट्यूटमध्ये व्हायरसची निर्मिती झाल्याचा आरोप आहे.
डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहान शहरात सर्वात आधी कोरोनाची लागण झाल्याचे आढळले होते. हा व्हायरस नेमका प्राण्यांमधून माणसांमध्ये कसा संक्रमित झाला, याचा शोध जागतिक आरोग्य संघटना घेणार आहे. भविष्यात अशाप्रकारे कोणत्याही साथीच्या रोगाचा फैलाव होऊ नये, यादृष्टीने संशोधन केले जात असले तरी चीन सरकारच्या असहकार्यामुळं त्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.