मुंबई – को-ऑपरेटिव्ह बॅंक एम्प्लॉईज युनियनच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कोंकण मर्कंटाईल को-ऑप. बॅंक पुरस्कृत आंतर सहकारी बॅंक कॅरम स्पर्धेत वैश्य सहकारी बॅंकेच्या संतोष शेरेने तीन गेम रंगलेल्या संघर्षपूर्ण लढतीत जनकल्याण सहकारी बॅंकेच्या भार्गव धारगळकरची 25-7, 5-25, 25-10 अशी झुंज मोडीत काढत चौथी फेरी गाठली. मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या सत्तू कांबळेने नवोदित अपना सहकारी बॅंकेच्या गितेश कोरगावकरवर 6-25, 25-5, 25-0 अशी तीन गेममध्ये मात करत चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. कपोल बॅंकेच्या दीपक पुत्रनने तीन गेम रंगलेल्या लढतीत वैश्य सहकारी बॅंकेच्या विशाल सावंतचा 0-25, 25-10, 25-0 असा पराभव करत आगेकूच कायम ठेवली.
म्युनिसिपल बॅंकेच्या राहुल पडेलकरने सरळ दोन गेममध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या विनायक आंगणेचा 25-3, 25-0 असा धुव्वा उडवला. रत्नागिरीच्या दत्ताराम नार्वेकरने एनकेजीएसबी बॅंकेच्या प्रकाश फणसेला सरळ दोन गेममध्ये 25-0, 25-9 अशी धूळ चारली. वैश्य सहकारी बॅंकेच्या अनिल पात्रेने महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या अमोल कदमला 4-25, 25-0, 25-0 असे नमवून विजयी वाटचाल कायम ठेवली. अग्रमानांकित अपना सहकारी बॅंकेच्या मंदार भरतावने अपना सहकारी बॅंकेच्याच प्रियेश पाठकला 25-0, 25-4 असे नमवून आपले वर्चस्व सिद्ध केले.
महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या वैदेही देशमुखने एनकेजीएसबी बॅंकेच्या मनाली शानभागला 25-5, 25-5 असे नमवित तिसरी फेरी गाठली. अपना सहकारी बॅंकेच्या गौरी कोरगावकरने कपोल बॅंकेच्या स्वरूपा ठाकूरला 25-1, 25-2 असे सरळ दोन गेममध्ये निष्प्रभ केले. म्युनिसिपल बॅंकेच्या मानसी पाटीलने दुसऱ्या फेरीच्या सामन्यात एनकेजीएसबी बॅंकेच्या वैशाली राऊतचा 25-0, 25-1 असा धुव्वा उडवित तिसरी फेरी गाठली.
महिला दुहेरी गटाच्या उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात म्युनिसिपल बॅंकेच्या मानसी पाटील-संगीता बेंबडे यांनी कपोल बॅंकेच्या कविता देसाई-स्वरूपा ठाकूर यांच्यावर 25-1, 25-3 अशी सहज मात करत उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या उप-उपांत्य फेरीत कोंकण मर्कंटाईल बॅंकेच्या कनिझ काजी-शकिल शेख यांनी एनकेजीएसबी बॅंकेच्या आशा वागळे-मानसी धनावडे यांना 25-3, 25-5 असे निष्प्रभ करत आगेकूच केली. अपना सहकारी बॅंकेच्या साक्षी सरफरे-प्रज्ञा आणेराव यांनी सरळ दोन गेममध्ये एनकेजीएसबी बॅंकेच्या मनाली शानभाग-वृषाली राऊतना 25-5, 25-6 असे नमवले.
पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात म्युनिसिपल बॅंकेच्या रवी गायकवाड-कल्याणजी परमार यांनी वैश्य सहकारी बॅंकेच्या अरविंद गांगण-संतोष शेरे यांना 25-0, 7-25, 25-2 असे नमवून तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. अपना सहकारी बॅंकेच्या महादेव जावीर-संतोष कदम यांनी कपोल बॅंकेच्या नितीन शहादिपक पुत्रन यांचा 25-6, 25-4 असा धुव्वा उडवला.
एसटी को-ऑप. बॅंकेच्या संदेश चव्हाण-संदेश तावडे यांनी सिटी बॅंकेच्या शिशिर खडपे-मिलिंद मेळेकर यांचा 25-5, 25-5 असा सरळ दोन गेममध्ये पराभव करून पुढची फेरी गाठली. चेंबूर नागरी सहकारी बॅंकेच्या सुमीत साटम-शैलेश सावंत यांनी कपोल बॅंकेच्या विनायक पाटील-दिनेश जैयस्वाल यांना 25-0, 25-4 असे नमवून तिसरी फेरी गाठली. ग्रेटर बॅंकेच्या राजेश देसाई-शैलेश करपे यांनी अटीतटीच्या लढतीत म्युनिसिपल बॅंकेच्या राजीव कांबळे-कांजी सोलंकी यांची झुंज 7-25, 25-0, 25-1 अशी मोडीत काढली.