नवी दिल्ली (वंदना बर्वे) – लोकसभेच्या निवडणुकीला अद्याप उशीर असला तरी भाजपने 2024ची तयारी सुरू केली आहे. ज्या दिवशी गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्याचे मतदान होईल तेव्हाच भाजप दिग्गज नेते दिल्लीत बसून लोकसभा निवडणुकीवर मंथन करणार आहेत.
सविस्तर वृत्त असे की, 18व्या लोकसभेची निवडणूक 2024 मध्ये होणे आहे. परंतु, भाजप आतापासून कामाला लागला आहे. येत्या 5 डिसेंबर रोजी गुजरातचे मतदार दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान करणार आहेत. अगदी याच वेळेस दीनदयाल उपाध्याय मार्गावर भाजपच्या मुख्यालयात पक्षाचे नेते लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा बैठक घेणार आहेत.
येत्या 5 आणि 6 डिसेंबर रोजी दिल्लीत भाजप नेत्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीची अध्यक्षता पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा करणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून समारोपाप्रसंगी संबोधित करतील. भाजपमधील सूत्रांनी दिलेल्यानुसार, जगतप्रकाश नड्डा विविध मुद्यांवर चर्चा करणार आहेत. पक्ष संघटनेच्या कामकाजासोबतच जागतिक आर्थिक मंदीच्या काळातही प्रगती करीत असलेली भारतीय अर्थव्यवस्था आणि जी-20 च्या अध्यक्षता या मुद्यांवर फोकस केला जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पदाधिकाऱ्यांनी लोकांमध्ये जावून सरकारच्या यशस्वी योजनांबाबत सांगावे असे सांगितले जाणार असल्याची माहिती आहे. तसेच त्रिपुरा आणि कर्नाटकसह ईशान्ये पूर्वेकडील राज्यांच्या विषयावरही चर्चा केली जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार भारत जी-20 देशांच्या बैठकीची अध्यक्षता करणार आहे. यासाठी भाजपकडून संपूर्ण देशात इव्हेंटचे आयोजन केले जाणार आहे. केंद्र सरकार प्रगतीसाठी किती कटिबध्द आहे याची माहिती लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी लोकांपर्यंत पोहचविण्यात यावी अशी सरकारची योजना आहे. या बैठकीला राज्यांचे प्रभारी, सहप्रभारी, आघाडींचे प्रमुख, प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे संघटन महासचिव यांना या बैठकीत हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.