विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या मुलाखतींकडे भोसरीतील प्रमुख इच्छुकांची पाठ

-विलास लांडे, दत्ता साने यांची नाराजी कायम

-पिंपरी, चिंचवडमधील सर्व इच्छुकांची उपस्थिती

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरतील तीन मतदारसंघासाठी रविवारी झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीकडे भोसरीतील प्रमुख इच्छुकांनी पाठ फिरविली. विरोधी पक्षनेते पदावरून हटविल्यामुळे साने मुलाखतीपासून दूर राहिल्याचे तर लांडे अपक्षच मतदानात उतरण्याच्या तयारीत असल्यामुळे त्यांनीही मुलाखतीसाठी न जाणेच पसंद केले. आजच्या घडामोडींमुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी समोरील अडचणी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तीन मतदारसंघाचा समावेश आहे. रविवारी (दि. 28) पुणे, मार्केट यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी महिला अध्यक्षा विद्या चव्हाण, पार्थ पवार हे इच्छुकांच्या मुलाखती घेणार असल्याचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी कळविले होते. आज झालेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमला अजित पवार अनुपस्थित होते.

पिंपरीतून नऊ, भोसरीतून सात तर चिंचवडमधून आठजण विधानसभेसाठी इच्छुक आहेत. एका विधानसभा मतदारसंघातील सर्व इच्छुकांना एकत्र बसवूनच मुलाखती घेण्यात आल्या. मतदारसंघातील परिस्थिती, विजयी होण्याची खात्री, वैयक्‍तिक काम, पक्षाची स्थिती यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्वच मतदारसंघातील इच्छुकांनी ज्याला तिकीट मिळेल, त्याचे काम करण्याची ग्वाही दिली.

पिंपरी व चिंचवडमधील सर्व प्रमुख उपस्थित असताना भोसरीतील दोन प्रमुख इच्छुकांनी मात्र मुलाखतींकडे पाठ फिरविली. विलास लांडे व दत्ता साने यांनी घेतलेल्या पक्षविरहित भूमिकेची चर्चा चांगलीच रंगली आहे. चिंचवड विधानसभेसाठी राजेंद्र जगताप, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर महादू भोंडवे, मयूर पांडुरंग कलाटे, नाना काटे, सतीश दरेकर इतर इच्छुक उपस्थित होते. तर पिंपरी विधानसभेसाठी आण्णा बनसोडे, शेखर ओव्हाळ, गोरक्ष लोखंडे, सुलक्षणा शिलवंत-धर, राजू बनसोडे व इतरांनी मुलाखती दिल्या.

अज्ञान की अजित पवारांची पाठ ?

रविवारी झालेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील इच्छुकांच्या मुलाखतीकडे अजित पवार यांनी पाठ फिरविली. स्वत:चा जिल्हा असल्यामुळे मुलाखतींची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर सोपविण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. जर अजित पवार उपस्थितच राहणार नव्हते तर पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये अजित पवार उपस्थित राहणार असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे हे स्थानिक नेत्यांचे अज्ञान आहे की पवारांनीच या मुलाखतींकडे पाठ फिरवली याबाबत इच्छुकांमध्ये चर्चा रंगली आहे.

शरद पवारांना आजच भेटलो

मुलाखतीला अनुपस्थित राहिल्याबद्दल विलास लांडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी आजच (रविवारी) भेटून चर्चा केली आहे. राष्ट्रवादीकडून लढायचे की अपक्ष हे अद्याप ठरले नसून प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच आपण निर्णय घेणार आहोत. मात्र भोसरी विधानसभेबाबत पवार साहेबांशी सर्व प्रश्‍नांवर सखोल चर्चा झाल्याचेही लांडे यांनी दैनिक ‘प्रभात’शी बोलताना सांगितले.

दत्ता साने अद्यापही नाराज

मुलाखतीसंदर्भात साने यांच्याशी संपर्क साधला असता थेट त्यांनी पक्षाने विरोधी पक्षनेता बदलाच्या घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्‍त केली. पक्ष वाढविण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सातत्याने आपण कार्यरत असताना केवळ दोन महिन्यांची मुदतवाढ न दिल्यामुळे आपण नाराज असून याच कारणातून आपण मुलाखतींसाठी गेलो नसल्याने साने यांनी सांगितले. विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय मात्र आपण घेतला असून कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या मैदानात उतरून आपण महेश लांडगे यांचा पराभव करू याचा पुर्नरुच्चारही त्यांनी यावेळी केला.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)