राष्ट्रीय क्रीडा संघटनेचा दर्जा
नवी दिल्ली – केंद्रशासनाच्या वाढत्या दडपणामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राष्ट्रीय क्रीडा संघटनेचा दर्जा स्वीकारण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीच्या (नाडा) कक्षेत ते येणार असून क्रिकेटपटूंवर याबाबत अंकुश राहणार आहे.
केंद्रीय क्रीडा सचिव राधेश्याम झुलानिया, “नाडा’ चे महासंचालक नवीन अग्रवाल, बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी व मंडळाचे सरव्यवस्थापक (क्रिकेट) सबा करीम यांच्यात येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जरी मंडळास आर्थिक स्वायत्तता असली तरी अन्य क्रीडा संघटनांप्रमाणेच बीसीसीआय ही राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या कार्यकक्षेत येणार आहे. त्यामुळे माहिती अधिकार कायद्यांतर्गत त्यांची माहिती घेण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे.
विविध खेळाडूंच्या ठावठिकाणांबाबत वेळोवेळी बीसीसीआयला नाडा संस्थेकडे माहिती द्यावी लागणार आहे. ही माहिती न देणाऱ्या खेळाडूंवर नाडा संस्थेकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. नाडा संस्थेने अन्य खेळांमधील काही खेळाडूंवर बंदीची कारवाई केली आहे.