पुणे – वर्ष 2021-22 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ महाराष्ट्रने कर्ज आणि ठेवींच्या वाढीच्या टक्केवारीमध्ये अव्वल कामगिरी करणारी बॅंक म्हणून स्थान पटकावले आहे.
मार्च 2022 च्या अखेरीस बॅंक ऑफ महाराष्ट्रने सकल कर्ज व्यवहारात 26 टक्के वाढ नोंदवून 1,35,240 कोटी रुपयांची नोंद केली आहे. त्यापाठोपाठ स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि युनियन बॅंक ऑफ इंडिया यांनी अनुक्रमे 10.27 टक्के आणि 9.66 टक्के वाढ नोंदविली आहे.
भारतीय स्टेट बॅंकेचा एकूण कर्जे व्यवहार 24,06,761 कोटी रुपये म्हणजे जवळपास 18 पटीने जास्त होता, तर बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या तुलनेत युनियन बॅंक ऑफ इंडियाचे चौथ्या तिमाहीच्या शेवटी रु 6,99,269 कोटी इतकी कर्जे होती.
ठेवींच्या वाढीच्या संदर्भात, बॅंक ऑफ महाराष्ट्रने 16.26 टक्के वाढ नोंदवली आणि मार्च 2022 अखेरीस 2,02,294 कोटी रुपये जमा केले. युनियन बॅंक ऑफ इंडिया ठेवींमध्ये 11.99 टक्के वाढीसह (रु. 10,32,102 कोटी) दुसऱ्या स्थानावर आहे. इंडिअन बॅंकेने 10 टक्क्यांनी वाढ करून रु. 5,84,661 कोटीचा व्यवसाय नोंदवले आहेत.
बॅंक ऑफ महाराष्ट्राची वित्त वर्ष 2022 मध्ये एकूण व्यवसाय वाढ देखील सर्वाधिक 20 टक्के म्हणजे 3,37,534 कोटी रुपये होती आणि त्यानंतर युनियन बॅंक ऑफ इंडियाची 11.04 टक्के वाढीसह 17,31,371 कोटी रुपये होती. आएएम (किरकोळ, कृषी आणि सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना ) विभागाना कर्ज वाटप करण्याच्या बाबतीत, बॅंक ऑफ महाराष्ट्रने सर्वाधिक 18.65 टक्के म्हणजेच 80,669 कोटी रुपयांची वाढ नोंदविली.
बॅंकेचे सकल अनार्जक कर्जे ( एनबीए ) मार्च 2021 मध्ये 7.23 टक्क्यांवरून जवळपास 3.94 टक्क्यांवर आले, तर निव्वळ अनार्जक कर्जे (एनपीए ) मार्च 2021 मधील 2.48 टक्क्यांवरून 0.97 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे .