सरकारी बॅंकांच्या परिस्थितीत सुधारणा

महाराष्ट्र बॅंकेसह तीन बॅंकांवरील निर्बंध झाले शिथिल

मुंबई – रिझर्व्ह बॅंक, सरकार आणि स्वत: बॅंकांनी नेटाने काम केल्यामुळे सरकारी बॅंकांची परिस्थिती आता सुधारू लागली असल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्सला प्रॉम्प्ट करेक्‍टिव्ह ऍक्‍शन (पीसीए) फ्रेमवर्कमधून बाहेर केले आहे.

वित्तीय सेवांचे सचिव राजीवकुमार यांनी आरबीआयच्या या निर्णयावर आपले मत व्यक्‍त करताना म्हटले की, बॅंकिंग सुधारणांसाठी सरकारने योग्य रणनीती अवलंबली आहे. चांगले प्रदर्शन करणाऱ्या तीन सावर्जनिक क्षेत्रातील बॅंकांना पीसीएतून बाहेर काढण्यात येत आहे. अशावेळी बॅंकांना अधिक जबाबदार ठरवले जाईल. त्याचबरोबर संकटाशी सामना करण्यासाठी उच्च मानक आणि बंदोबस्त करावा लागेल.

आरबीआयचे गव्हर्नर शक्‍तिकांत दास यांच्या या निर्णयाने या तीनही बॅंकांवरील कर्ज देण्याची आंशिक बंदी हटवली गेली आहे. विशेष म्हणजे तत्कालीन गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या कार्यकाळात मोदी सरकारने त्यांना पीसीए फ्रेमवर्कमध्ये असलेल्या 11 सरकारी बॅंकांना ढिलाई देण्यास सांगितले होते. यामुळे बाजार प्रभावित होऊ शकतो, असे कारण सांगण्यात आले होते. पण पटेल यांनी याबाबत निर्णय घेतला नव्हता. मात्र, शक्‍तिकांत दास यांचा हा निर्णय सरकारची मागणी पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल मानले जाते.

आरबीआयने आपल्या ताज्या निवेदनात म्हटले आहे की, विविध परिस्थिती आणि सुक्ष्म निरीक्षणानंतर बॅंक ऑफ इंडिया आणि बॅंक ऑफ महाराष्ट्रला पीसीए फ्रेमवर्कमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही बॅंकांनी नियामकसंबंधीची मानके पूर्ण केली आहेत. यामध्ये कॅपिटल कन्झर्वेशन बफरचाही (सीसीबी) समावेश आहे.

तिसऱ्या तिमाहीनुसार या बॅंकांचे एकूण नॉन परफॉर्मिंग असेट्‌सचे (एनपीए) प्रमाण सहा टक्‍क्‍यांपेक्षाही कमी आहे.
ओबीसीच्या प्रकरणात एकूण एनपीए सहा टक्के आहे. अशात पीसीए फ्रेमवर्कअंतर्गत ओबीसीवरील प्रतिबंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध परिस्थिती आणि अत्यंत सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.