‘ऐकून घेतो म्हणून काहीही बोलायचं नाही’; बाळासाहेब थोरात बैठकीतच NCP कार्यकर्त्यावर भडकले…

अकोले (नगर) – राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अकोले तालुक्यात रविवारी (१८ एप्रिल २०२१) झालेल्या कोरोना आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने चांगलाच गोंधळ घातल्याची घटना बघायला मिळाली. बैठकीत मंत्री बाळासाहेब थोरात नागरिकांचे प्रश्न ऐकून घेत असताना राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्याने मोठ्या आवाजात प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने रेमडेसिवीरच्या तुटवड्यावरून बैठकीत आक्रमक रूप धारण करत चांगलाच गोंधळ घातला. कोरोनाआढावा बैठकीतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षाने रेमडेसीवीर इंजेक्शनसंदर्भात प्रश्नांची सरबत्ती केली. अकोले तालुक्याची कोरोनामुळे बिकट अवस्था झाली असताना नीट आरोग्य सुविधा पुरवल्या जात नाही’, असे सांगत आरोग्य विषयक तक्रारीचा पाढाच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवि मालुंजकर यांनी वाचला. त्यामुळे बैठकीत एकच गोंधळ उडाला. बैठकीतील इतर कार्यकर्त्यांनी मालुंजकर यांना खाली बसण्यास सांगितले. पण, तरीही मालुंजकर प्रश्न विचारतच होते.

विशेष म्हणजे या प्रकाराने संतप्त झालेल्या बाळासाहेब थोरात यांनी देखील या कार्यकर्त्याला चांगलंच झापलं. तुझं जितकं वय आहे तितकं माझं राजकारण आहे. तुम्हाला संवेदना आहेत आणि आम्हाला नाही आहेत का? असा प्रश्नही थोरातांनी त्याला विचारला. आम्ही ऐकून घेतो म्हणजे काहीही बोलायचं असं नाही, असंही त्यांनी सुनावलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.