परभणी – दिल्लीतील नेते शिवसेनेसोबत आघाडी करण्यास अनुकूल नव्हते. शिवसेनेबरोबर जायचे की नाही, याबाबत संभ्रम होता. पण भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेबरोबर आघाडी करावी, असे राज्यातील नेत्यांचे मत होते.
कारण भाजपने कॉंग्रेस पक्षाला संपवण्याचे काम सुरु केले होते. म्हणून भाजपला रोखण्यासाठी आपण शिवसेनेबरोबर गेलो, अशी माहिती कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी दिली.
परभणीतील व्यंकटेश मंगल कार्यालयात कॉंग्रेसची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी जिल्हा कॉंग्रेस कमिटी ओबीसींच्या पदाधिकाऱ्यांना अशोक चव्हाणांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी सुरेश नागरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
अशोक चव्हाण म्हणाले, सत्तेत असताना आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, या मताचा मी आहे. पण दुर्दैवाने करोनामुळे 30 टक्केच निधी मिळाला, पण मराठवाड्याला अधिकचा निधी देण्याची माझी भूमिका आहे, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
दरम्यान, विधानसभा निवडणुकांपूर्वी कॉंग्रेसला रामराम ठोकणारे परभणीतील सुरेश नागरे यांनी आज घरवापसी केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि कॉंग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला.