नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वावरावर दिल्ली पोलिसांचे अजूनही निर्बंध कायमच असल्याचे अनुभवाला येत आहे, असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे. त्यांच्या निवासस्थानाचे दार अमित शहा यांच्या सुचनेनुसार बाहेरून लाऊनच घेण्यात आले होते, असेही त्यांनी म्हटले आहे.
पण त्यांचा हा दावा पोलिसांनी अमान्य केला आहे. मुख्यमंत्र्यांवर कोणतेही निर्बंध नाहीत ते आज सकाळी आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी निघून गेले आहेत असेही पोलिसांनी सांगितले. काल केजरीवाल सिंघु बॉर्डरवर आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना घराबाहेर पडू दिले गेले नव्हते.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर अघोषित आणिबाणी सारखीच स्थिती निर्माण झाली आहे असा आरोप आप चे प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी काल पत्रकार परिषदेत केला होता. आजही त्यांनी तसाच दावा करताना सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या वावरावर अमित शहा यांच्या निर्देशानुसार निर्बंध घालण्यात आले आहेत.