केंद्र सरकारचाही निरोप अण्णांनी धुडकावला

माजी मंत्री गिरिश महाजन यांनी शिष्टाई पुन्हा "फेल'; शनिवारपासून उपोषणावर अण्णा हजारे ठाम

पारनेर – शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर उच्चाधिकार समिती तातडीने नियुक्‍त करण्यात येईल. तसा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर राळेगणला त्या संदर्भात अधिक माहिती देतील, असा केंद्र सरकारचा निरोपही अण्णांनी आज धुडकावत उपोषण आंदोलनावर ठाम असल्याची घोषणा केली.

भाजप नेते माजी मंत्री गिरिश महाजन यांनी आज पुन्हा एकदा अण्णांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. तथापि, तो निष्फळच ठरला. केंद्र सरकारचा निरोप घेऊन महाजन आज राळेगणला आले होते. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालास हमीभाव मिळावा, तसेच केंद्रिय कृषिमूल्य आयोगाला स्वायत्ता मिळावी, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या शनिवारपासून (ता. 30) अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथेच उपोषण आरंभणार आहेत.

अण्णांनी हे आंदोलन करू नये, यासाठी त्यांची मनधरणी करण्यास अलीकडेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महाजन व ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अण्णांची भेट घेतली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार फडणवीस, महाजन यांनी केंद्रिय कृषिमंत्री तोमर यांची भेट घेवून चर्चा केली होती. त्या भेटीतील तपशिल देण्यासाठी आज महाजन पुन्हा राळेगणला आले होते. केंद्रिय कृषिमंत्री तोमर यांनी त्या संदर्भाद लेखी पत्र आज पाठविले होते. मात्र, ते पत्र अण्णांचे समाधान करू शकले नसल्याची माहिती अण्णांच्या कार्यालयातून देण्यात आली.

महाजन यांनी आज सकाळी त्या पत्राच्या आधारे जवळपास एक तास अण्णांशी चर्चा केली. मात्र, त्यात दुरुस्त्या करत हजारे केंद्राला सुधारित मसुदा पाठविणार आहेत. त्यावर केंद्र सरकारचे समाधानकारक उत्तर आले, तरच उपोषण मागे घेण्याबाबत विचार करू. मात्र, जर नव्याने सुचविण्यात आलेल्या मसुद्यांवर सरकार सहमत नसेल, तर उपोषण आंदोलन कायम असेल, अशी भूमिका हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली.

अण्णांचे आरोग्य महत्त्वाचे : महाजन
अण्णांचे वय आता 83 वर्षांचे आहे. त्यामुळे वयाचा व आरोग्याचा विचार करता अण्णांची उपोषण करू नये, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांची इच्छा असल्याची भूमिका माजी मंत्री महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. तसेच दिल्लीतील शेतकरी आंदोलनातील हिंसक प्रकार निंदनीयच आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात असे अनुचित प्रकार होणे निषेधार्थच आहे, असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.