पावसाचा निकष लावल्याने जनावरे उपाशी

-मंडलात पावसाचे प्रमाण पाहून प्रशासनाने छावण्या केल्या बंद

-अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे शेतकरी त्रस्त

-रवींद्र कदम

नगर – प्रशासनाने प्रत्येक मंडलात झालेल्या पावसाची आकडेवारी पाहून चारा छावण्या बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, मंडलातील सर्वच गावांमध्ये एकसारखा पाऊस न झाल्याने अनेक गावांमध्ये आजही पाण्याची व चाऱ्याची टंचाई आहे. मात्र, प्रशासनाच्या नवीन तोंडी निकषाप्रमाणे छावण्या बंद झाल्याने जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाच्या या आडमुठेपणामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

जिल्ह्यात नगर, जामखेड, पारनेर, कर्जत, पथर्डी, शेवगाव तालुक्‍यांत 8 ऑगस्ट पर्यंत 160 चारा छावण्या सुरू होत्या. या छावण्यामध्ये लहान जनावरे 9 हजार 801, तर मोठी 80 हजार 858 जनावरे अशी एकूण 90 हजार 659 जनावरे होती. परंतु प्रशासनाने प्रत्येक मंडलात झालेल्या पावसाची आकडेवारी पाहून चारा छावण्या बंद करण्याचे तोंडी आदेश मंडल अधिकारी, तलाठी यांच्या मार्फत चारा छावणी चालकांना व शेतकऱ्यांना पाठविले. चारा छावण्या बंद करा अन्यथा बिले निघणार नाहीत, असे सांगितले. तालुक्‍यातील सगळ्या चारा छावण्या बंद होत आहेत. चारा छावणी बंद करा, असे लेखी द्या, अन्यथा तुमच्या चारा छावण्यांवर कारवाई करून दंड केला जाईल, असे सांगितले.

त्यामुळे अनेक तालुक्‍यांतील चारा छावण्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 14 ऑगस्टच्या आकडेवारीनुसार या तालुक्‍यांत 111 चारा छावण्या सुरू आहेत. यामध्ये 6 हजार 491 लहान जनावरे, तर 54 हजार 861 मोठी जनावरे आहेत. असे एकूण 61 हजार 352 जनावरे छावणीत आहेत. त्यामुळे या तालुक्‍यांतील 49 चारा छावण्या बंद करण्यात आल्या. या 49 छावण्यांतील 29 हजार 307 जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची प्रशासनाने दखल घ्यावी. मंडलनिहाय पावसाच्या आकडेवारीनुसार छावण्या बंद न करता त्या गावातील पावसाची परिस्थिती पाहून गावात चारा व पाणी उपलब्ध झाले आहे का? याची पाहणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

प्रशासनाने मंडलात अधिक पाऊस झाल्याचे सांगत त्या मंडलातील चारा छावण्या बंद केल्या. मात्र, त्या मंडलातील गावांची सद्यस्थिती पाहता त्या गावात अद्यापही जनावरांसाठी चारा व पाणी उपलब्ध झाला नसल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. प्रशासनाने वस्तुस्थिती न पाहता छावण्या बंद करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. तसेच जनावरांना उपाशी ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

नगर तालुक्‍यातील सावेडी मंडलात मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. मात्र, सावेडी मंडलात येणाऱ्या गावात किती पाऊस झाला. तसेच त्या गावात चारा उपलब्ध झाला आहे का? विहिरींना पाणी उपलब्ध झाले का? याची प्रशासनाने शहानिशा करावी. हे न करताच प्रशासनाने तत्परता दाखवत तोंडी आदेश देत छावण्या बंद केल्या. एकीकडे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी सांगतात की चारा छावण्या 31 ऑगस्ट पर्यंत सुरू ठेवा व दुसरीकडे त्यांचेच अधिकारी चारा छावण्या बंद करण्याचे सांगत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शेतकऱ्यांच्या सहमतीने छावण्या बंद : द्विवेदी

ज्या चारा छावण्या बंद झाल्या आहेत. त्या शेतकऱ्यांच्या व छावणी चालकांच्या सहमतीने बंद झाल्या आहेत. ज्या मंडलातील गावांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. ज्या गावांत चारा, पाणी उपलब्ध नाही, अशा गावाचे पंचनामे करून त्या गावातील जनावरे लगतच्या गावात सुरु असलेल्या चारा छावण्यांमध्ये दाखल करण्यात येतील. परंतु बंद झालेल्या चारा छावण्या पुन्हा सुरू करता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.

“जिल्हाधिकाऱ्यांनी गावात यावे. त्यांनी चारा व पाणी दाखवावे. गावात चारा व पाणी असेल, तर आम्हाला डोंगराच्या कडेला अंधारात राहण्याची हौस आहे का, असा प्रश्‍न शेतकऱ्यांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी चुकीचा अहवाल पाठवून व छावणी चालकांना छावणी सुरू ठेवल्यास दंड केला जाईल, असा धाक दाखवून छावणी चालकांकडून व शेतकऱ्यांकडून बळजबरीने लिहून घेतले आहे. जिल्हाधिकारी यांनी स्वत: गावची पाहणी करावी.
-शरद झिने, शेतकरी, पिंपळगाव माळवी

शेतकऱ्यांचे अधिकाऱ्यांना आव्हान

बोअरवेल, विहिरींना अद्यापही पाणी नाही, जनावरांसाठी चारा नाही आणि प्रशासन अधिकारी पाठवून सांगतात की तुमच्या मंडलात खूप पाऊस झाला आहे. तुम्ही चारा छावणी बंद करा. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पिंपळगाव माळवी गावात यावे व कोणत्या विहिरींना पाणी आलयं व चारा कुठे उगवला ते दाखवावेच, असे आव्हान शेतकऱ्यांनी दिले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×