आसामबाबत कॉंग्रेसचे धोरण चुकीचे -अमित शहा

भाजपा सत्तेत आल्यानंतर घुसखोरी रोखली

गुवाहाटी – भाजप आसामला काश्‍मीर होऊ देणार नसल्याचे विधान भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काढले आहेत. शहा यांनी पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करत हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफच्या जवानांना हौतात्म्य आले आहे. त्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नसल्याचे
शहा म्हणाले.

1985 मध्ये आसाम करार झाला आणि त्यानंतर 10 वर्षांपर्यत आसाम गण परिषदेचे सरकार राहिले, 25 वर्षे कॉंग्रेसने राज्य केले, 20 वर्षे केंद्रात कॉंग्रेसची सत्ता राहिली, परंतु आसाम करारावर अंमलबजावणी झाली नाही. इतकी वर्षे सत्तेवर राहूनदेखील हे पक्ष एनआरसीवर अंमलबजावणी करू शकलेले नाहीत. या पक्षांनी आसाममधील घुसखोरी रोखली नाही, असा आरोप भाजप अध्यक्षांनी केला आहे.

भाजप सरकार स्थापन होताच आम्ही एनआरसी प्रक्रिया सुरू करून घुसखोरी रोखण्याचे काम केले. भाजप आसामला काश्‍मीर होऊ देणार नाही. नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयकाला विरोध करणाऱ्य़ांना जनतेने स्थानिक निवडणुकीत पराभूत केल्याचा दावा शहा यांनी केला आहे.

ईशान्य भारत असो किंवा जम्मू-काश्‍मीर भाजप सरकारने दहशतवादाच्या समूळ उच्चाटनाची शपथ घेतली आहे. दहशतवादाच्या विरोधात लढण्याची सर्वाधिक इच्छाशक्‍ती केवळ नरेंद्र मोदी यांच्यातच असल्याचे शहा म्हणाले.
पुलवामा हल्ल्यात आसाममधील जवान मानेश्वर यांना हौतात्म्य आले आहे. केंद्रात कॉंग्रेसचे नव्हे तर भाजपचे सरकार असल्याने जवानांचे हौतात्म्य वाया जाणार नाही. आमच्या जवानांवर हल्ला करून आम्हाला कमकुवत करण्याचे स्वप्न कोणी पाहात असेल तर ती त्याची चूक ठरेल, असे शहा म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.