आसाममध्ये घुसखोरांना येऊ देणार नाही : शाह

कलियाबोर -आसामच्या कलियाबोर येथे भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांची जाहीर सभा झाली. संबोधनाच्या प्रारंभी शाह यांनी पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेले मानेश्वर बासुमतारी यांना श्रद्धांजली वाहिली. आसाम गण परिषद, भाजप आणि बोडोलॅंड पक्ष यांची आघाडी राज्यातील सर्व 14 जागांवर विजयी होणार असल्याचा दावा शाह यांनी केला आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास आसाममधील प्रत्येक घुसखोराला देशाबाहेर हाकलणार असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.

निवडणुकीत दोन गट स्पष्टपणे विभागले गेले आहेत. एक गट राहुल यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचा आहे. तर काही घोषित आघाडीत आहेत, तर काही जण गुपचुपपणे आघाडीसोबत आहेत. दुसरीकडे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली रालोआ या देशाच्या सेवेसाठी सज्ज आहे.

आसाममध्ये रालोआ सर्व 14 जागा जिंकणार असल्याचे शाह म्हणाले. मोदींसारखे कणखर नेतृत्व विजयी करायचे आहे का नेता नसलेल्या आघाडीला जिंकून द्यायचे याचा निर्णय जनतेनेच घ्यावा. पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे असल्याचे देशाच्या जनतेने स्पष्ट केले आहे. आसाममध्ये 14 मतदारसंघांमध्ये कोणत्याही घटक पक्षाचा उमेदवार असला तरीही सर्व कार्यकर्त्यांनी त्याला विजयी करण्यासाठी परिश्रम करावेत असे शाह यांनी आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.