आंबेगाव दुर्घटना : आर्किटेकचा अटकपूर्व, तर ‘कामगार-ठेकेदार’चा नियमित जामीन फेटाळला

पुणे – आंबेगाव बुद्रुक परिसरातील वेणूताई चव्हाण तंत्रनिकेतनची सीमा भिंत कोसळून सहा कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणात आर्किटेकचा अटकपूर्व तर अटक केलेल्या कामगार ठेकेदार पिता-पुत्रांचा नियमित जामीन सत्र न्यायाधीश के.डी.वडणे यांनी फेटाळला.

ज्ञानेश्‍वर ओंकार निकम यांचा अटकपूर्व, तर, सत्यमेव रामराज चौहान (वय 47) आणि त्यांचा मुलगा दिवाकर (वय 24, बालाजीनगर) या दोघांचा नियमित जामीन फेटळण्यात आला आहे. 1 जुलै रोजी रात्री 11.40 च्या सुमारास झालेल्या घटनेत सहा कामगारांचा मृत्यू झाला होता. तर दोनजण गंभीररित्या आणि आठजण किरकोळ जखमी झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी चौहान पिता-पुत्रांना अटक केली आहे.

न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर त्यांनी ऍड. विवेक भरगुडे, ऍड. कुमार पायगुडे आणि ऍड. राकेश ओझा यांच्यामार्फत, तर आर्किटेक निकम यांनी ऍड. हेमंत झंजाड, ऍड. नंदकुमार शिंदे आणि ऍड. राहुल खरे यांच्यामार्फत अटकपूर्वसाठी अर्ज केला होता. निकम यांनी केवळ बील सर्टीफाईड केले होते. प्लॅनचे डिझाईन केले नव्हते. संबंधित संस्थेने दुसऱ्या आर्किटेकद्वारे ते केले होते. तसेही आर्किटेकची जबाबदारी केवळ प्लॅन डिझाईन करण्यापुरतीच असते. भिंत बांधकामासंदर्भातील जबाबदारी इंजिनिअर, सुपरवायझरची असते. त्यामुळे निकम यांना अटक करण्याची गरज नाही. ते तपासास सहकार्य करण्यास तयार असल्याचा युक्तीवाद ऍड. झंजाड यांनी केला.

यास अतिरिक्त सरकारी वकील जावेद खान यांनी विरोध केला. सिंहगड कॉलेज येथे बांधलेल्या भींतिचे कामकाज नित्कृष्ट दर्जाचे असल्याचा शासकीय अभियांत्रिकी विद्यालयाचा अहवाल प्राप्त झाल आहे. निकम हे महापालिकेचा आर्किटेक आहे. त्यांनी बांधकाम नित्कृष्ट दर्जाचे असताना सर्टीफाईड करून बीलाची रक्कम अदा केलेली आहे. त्यांनी वेळीच गुणवत्ता तपासून बांधकाम रोखले असते, तर ही दुर्घटना घडलीच नसती. त्यामुळे त्यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे दिसून येत आहे. मृत्यूमुखी पडलेले कामगार अत्यंत गरिब कुटुंबातील आहेत. त्यामुळे साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्‍यता आहे. यासाठी निमक यांचा अटकपूर्व, तर, चौहान पिता-पुत्रांचा जामीन फेटळण्याची मागणी ऍड. खान यांनी केली.

दरम्यान सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे ऍड. हेमंत झंजाड यांनी सांगितले

Leave A Reply

Your email address will not be published.