Pimpri Crime : आळंदीतील ‘तो’ खून जबरी चोरीला विरोध करताना झाला

खूनाचा उलगडा करण्यात आळंदी पोलिसांना यश; दोघांना अटक

पिंपरी – खुनाच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीची करोना काळात तात्पुरत्या जामिनावर सुटका करण्यात आली. तो आळंदी घाटावर फिरत असताना 23 फेब्रुवारी रोजी रात्री त्याच्यासोबत जबरी चोरीचा प्रयत्न झाला. त्यावेळी झालेल्या भांडणात तिघांनी मिळून त्याचा खून केला. कोणताही पुरावा नसताना आळंदी पोलिसांनी शिताफीने तपास करत दोघांना अटक केली.

संतोष उर्फ कांच्या केरबा कांबळे (वय 19, रा. काळेवाडी देहूफाटा, ता. आळंदी), केतन प्रकाश शिंदे (वय 18 वर्ष 3 महिने, रा. नगर परिषद जवळील झोपडपट्टी, आळंदी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा देविदास उर्फ देव्या बबन चौरे (रा. हडपसर) फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. महादेव शाम खंदारे (वय 30) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 फेब्रुवारी रोजी धीरज संजय कुबेर (वय 30, रा. आळंदी) यांनी आळंदी पोलिसांना माहिती दिली की, इंद्रायणी नदीच्या घाटावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. त्याच्या डोक्‍यात जड वस्तूने मारले असून चेहरा विद्रुप केला आहे. त्यानुसार आळंदी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत खुनाचा गुन्हा दाखल केला.

सुरुवातीला घटनेबाबत काहीही पुरावा आढळला नाही. मयताच्या मोबाईल फोनवरून त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. मात्र आरोपींबाबत सुरवातीला कोणतीही माहिती मिळाली नाही. आळंदी पोलिसांनी दोन पथके तयार करून गुन्ह्याचा तपास सुरु केला. त्यात संशयित आरोपी निष्पन्न करून संतोष आणि केतन या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे चौकशी केली असता आरोपींनी त्यांच्या देविदास नावाच्या साथीदारासोबत मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले. आळंदी घाटावर फिरत असताना मयत महादेव खंदारे यांच्याकडील ऐवज जबरदस्तीने चोरताना त्यांच्यात झालेल्या वादातून हा प्रकार केल्याची आरोपींनी कबुली दिली. मयत व्यक्ती महादेव खंदारे याला तळेगाव दाभाडे पोलीसांनी 2016 मध्ये खून प्रकरणी अटक केली होती. करोना काळात त्याला तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आले होते.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, उपनिरीक्षक सुरेखा सागर, बापू जोंधळे, पोलीस कर्मचारी राजाराम लोणकर, बाळासाहेब खेडकर, नितीन साळुंखे, बाजीराव सानप, गजानन आडे, कैलास गर्जे, त्रिमूर्ती भोंडवे, दत्तात्रय टोके, संदीप रसाळ, रामदास मुकणे, मछिंद्र शेंडे यांच्या पथकाने केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.