केंद्राने तातडीने पथक पाठवावे – अजित पवार

सोलापूर – राज्यात काही दिवसांपासून परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. यात प्रामुख्याने पश्‍चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बोलणे झाले आहे. त्यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. राज्याला सध्या निधीची गरज असल्याने केंद्र सरकारने त्यांची पथक तातडीने पाठवावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

तसेच पुरामुळे अनेक नागरिकांचे बळीही गेले आहेत.
अजित पवार यांनी आज अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी केली. तसेच काही वेळापूर्वी त्यांनी पंढरपूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. या पुरामुळे बाधित झालेल्या रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देत, शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

पवार म्हणाले, मी नुकसानग्रस्त भागातील अनेक लोकांशी बोललो, तिथले वयस्कर लोक म्हणाले की, इतका पाऊस आम्ही आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. त्यावरून आपण नुकसानाची कल्पना करू शकतो. या पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रामुख्याने पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि सांगली या जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे.

जी धरणं अनेकदा भरत नाहीत तीदेखील या मुसळधार पावसामुळे भरली आहेत. वीर आणि उजनी धरणातून जास्त पाणी सोडण्यात आले आहे. काही ठिकाणी लोकांनी ओढ्यांमध्ये केलेल्या अतिक्रमणामुळेदेखील शेतीचे नुकसान झाले आहे.
सध्या प्रशासनाकडून पूरबाधित लोकांची व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे. राज्यातील परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलले आहेत. त्यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. राज्याला सध्या निधीची गरज आहे. आम्ही नुकसानाची पाहणी करून केंद्राकडे मदत मागणार आहोत. केंद्र सरकारने राज्यातील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी त्यांची पथक तातडीने राज्यात पाठवावे, असे त्यांनी सांगितले.

तसेच केंद्र सरकारने जीएसटीचे पैसे अद्याप दिलेले नाहीत. राज्याचे तब्बल 60 हजार कोटी थकित आहेत. त्यामुळे केंद्राने लवकरात लवकर राज्याला जीएसटीचे पैसे द्यावेत. याशिवाय नुकसानग्रस्त भागाला मदत करण्यासाठी निधी द्यायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.