नगर | स्थायी समिती सभापती निवडणूक : शिवसेनेच्या माघारीमुळे ‘बिनविरोध’ संधी, राष्ट्रवादीचे घुले सभापती

नगर – महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश घुले यांची आज बिनविरोध निवड झाली. शिवसेनेचेच सदस्य सभापती निवडीच्या सभेला गैरहजर राहिल्याने हतबल झालेले शिवसेनेचे उमेदवार विजय पठारे यांनी अखेरीस माघार घेतली. त्यामुळे घुले यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सभापती निवडीची सभा झाली. महापालिकेच्या स्थायी समितीची सभापतीपदाची निवडणूक आज झाली. या जागेसाठी चार अर्ज आले होते. मंगळवारी (दि.2) रोजी राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुले यांनी भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला होता.

घुले यांच्या एका अर्जाला बसपचे मुदस्सर शेखे हे सुचक तर राष्ट्रवादीचे प्रकाश भागानगरे हे अनुमोदक होते. दुसर्‍या अर्जावर राष्ट्रवादीचेच डॉ. सागर बोरुडे हे सुचक असून काँग्रेसच्या सुप्रिया जाधव या अनुमोदक होत्या. बुधवार (दि.3) रोजी सेनेचे नगरसेवक विजय पठारे यांनी दोन अर्ज दाखल केले.

त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र असताना नगरमध्ये राष्ट्रवादीच्या मदतीला भाजप असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरु होती. मात्र दुसर्‍यादिवशी शिवसेनेचे नगरसेवक पठारे यांनी घुले यांच्या विरोधात दोन अर्ज दाखल केले. आर्ज छाननी नंतर पठारे यांनी अर्ज मागे, घेतल्याने निवडणुक अधिकारी भोसले यांनी घुले यांची बिनविरोध निवड केली.

शिवसेनेचे सदस्यच गैरहजर; उघड बंडाळी..!
स्थायी समितीत सोळा सदस्य असून, त्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी पाच, भाजपचे चार आणि काँग्रेस, बसपचा प्रत्येकी एक सदस्य आहेत. 16 पैकी आज 13 सदस्य निवडीच्या सभेला उपस्थित होते. त्यात शिवसेनेचे प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, श्याम नळकांडे हे सदस्य गैरहजर राहिले. त्यामुळे शिवसेनेतील ही उघड बंडाळी मानली जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.