नगर | करोना रुग्णवाढीचा भडका कायम..! नालेगाव अमरधामामध्ये 35 जणांवर अंत्यसंस्कार

नगर – ‘ब्रेक दी चेन’साठी राज्य सरकारने घोषित केलेल्या संचारबंदीलाही करोना विषाणू आता जुमानत नसल्याचे चित्र आज नगरमध्ये स्पष्ट झाले आहे. कालचे रेकॉर्ड ब्रेक करत दररोज सुरू असलेला करोनाबाधित रुग्णवाढीचा भडका आजही कायम असल्याचे समोार आले आहे. नगर जिल्ह्यात आजही तब्बल 3 हजार 56 नवे करोनाबाधित रुग्ण सापडले असून, त्यात एकट्या नगर शहरातील 730 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्हा प्रशासनाच्या हवाल्याने माहिती अधिकारी कार्यालयाने आज घोषित केलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आता मोठ्या संख्येने करोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. नगर शहरापाठोपाठ राहाता तालुक्यात करोना विषाणूने थैमान घातले आहे. तेथेही आज सर्वाधिक 285 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नगर शहरात जसे रुग्णांना अ‍ॅडमीट करण्यासाठी साधे बेड, ऑक्सीजन बेड किंवा व्हेंटीलेटर मिळत नाहीत, तशीच अवस्था राहाता तालुक्यात झाली आहे.

करोना विषाणूने काल नगर जिल्ह्यातील तब्बल 3 हजार 97 नव्या रुग्णांना घेरले. त्यामुळे जिल्ह्यातील चिंताजनक परिस्थिती आणखी गंभीर होत चालली असल्याचे चित्र आहे. ‘ब्रेक दी चेन’चाही नगरमध्ये फज्जा उडाल्याचे चित्र आहे. दरम्यान, नेहमीप्रमाणे रस्त्यावर फिरणार्‍या नागरीकांना आवर घालण्यासाठी पोलिसांची यंत्रणा रस्त्यावर अभावानेच दिसत आहे. रस्त्यावर फिरताना हटकणारे कुणीच नसल्याने एवढ्या भयंकर संकटात देखील नागरिक बिनधास्त फिरत आहेत.

ज्यांच्या घरात करोनाबाधित आहेत. त्यांच्या मात्र काळजाचा ठोका चुकत आहेत. अशा संपूर्ण परिवाराची अगदीच केविलवाणी अवस्था झाली आहे. ओळखीचे, जवळचे किंवा मित्रांना फोन करुन करुन करोनाबाधित किंवा त्यांचे घरातील नातेवाईक अस्वस्थ झाले आहेत. कुठूनतरी मदत मिळेल, या आशेने ते फोना-फोनी करत आहेत.

मात्र, अनेकांचा नाईलाज होत आहे. त्यात अगदीच टोकाचे प्रयत्न करुनही ऑक्सिजन बेड किंवा व्हेंटीलेटर न मिळालेल्यांना मृत्यू कवेत घेत असल्याचे चित्र आहे. खिन्न मनाने घरातील व्यक्तिंवर अंत्यसंस्कार करताना अनेकांना आता नैराश्य येऊ पाहत आहे. मात्र, तरी देखील रस्त्यावरील गर्दी कमी होत नसल्याने हे थांबणार कधी? असे केविलवाणे प्रश्‍नचिन्ह अनेकांच्या चेहर्‍यावर पहायला मिळत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.