कोलकाता, दि. 18 – पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणूकीसाठी भाजपने 148 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाचे उपाध्यक्ष मुकुल रॉय आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष राहुल सिन्हा यांचाही समावेश आहे. विद्यमान खासदारांना आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमदारकीसाठी उमेदवारी देण्याची प्रथा भाजपने पश्चिम बंगालमध्येही कायम ठेवली आहे.
लोककलाकार आशिम सरकार यंना हरिनघाटा विधानसभा मतदारसंघातून तर संशोधक गोबर्धन दास यांना पुरबस्थली उत्तर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी प्रदेशध्यक्ष राहुल सिन्हा यांना हबरा येथून आणि माजी केंद्रीय मंत्री अणि तृणमूलमधून भाजपमध्ये आलेल्या मुकुल रॉय यांना कृष्णनगर उत्तर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाने पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत केंद्रीय मंत्र्यांसह पाच खासदारांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे.
पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका आठ टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात 27 मार्चला व 29 एप्रिलला शेवटच्या मतदान होणार आहे. तर निवडणूकीचा निकाल 2 मे रोजी जाहीर होणार आहे.