पुणे – दारुसाठी पत्नीने तिच्या माहेरच्यांकडून पैसे आणावेत, यासाठी पतीकडून सातत्याने होणाऱ्या छळास कंटाळून विवाहीतेने गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना लष्कर परिसरात 4 जुन रोजी घडली. याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे.
स्वाती रोहित पवार (रा. गार्डन वडापाव जवळ, बुटी स्ट्रिट, लष्कर) असे आत्महत्या केलेल्या विवाहीतेचे नाव आहे. तर पती रोहीत राजु पवार (वय 22) यास अटक केले आहे. त्याच्यासह एका महिलेविरुद्ध पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी निर्मला मिसाळ (वय 34, रा. भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची मुलगी स्वाती हिचा एक वर्षापुर्वी रोहीतसमवेत विवाह झाला होता.
लग्न झाल्यापासून रोहित हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ व मारहाण करीत होता. रोहित यास दारुचे व्यसन आहे. पत्नीने दारुसाठी माहेरच्यांकडून पैसे आणावेत, यासाठी तो पत्नीला सातत्याने शारिरीक व मानकिस छळ करीत होता. या जाचास कंटाळून स्वातीने शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.