हुंड्यासाठी छळल्याने विवाहितेची आत्महत्या; सहा महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

तुळजापूर – लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यात विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील आरळी (खूर्द) येथे घडली आहे. प्रिया घोडके (वय 23) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार हुंड्यासाठी छळ केल्याने आत्महत्या केली असून याप्रकरणी पतीसह सासू, सासरे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया घोडके हिचे तुळजापूर येथील पंकज घोडके याच्याशी एप्रिल 2021 मध्ये लग्न झाले होते. लग्नामध्ये दोन लाख रुपये हुंडा देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे प्रियाच्या वडिलांनी 40 हजार रुपये दिले व बाकी 1 लाख 60 हजार रुपये एक महिन्यात देण्याचे ठरले होते.

लग्न झाल्यानंतर हुंड्यात ठरलेली बाकीची रक्कम मिळत नसल्याने ते पैसे माहेरून आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून प्रियाचा शारीरिक व मानसिक छळ होऊ लागला. याला कंटाळून तिने गळफास लावून आत्महत्या केल्याची फिर्याद मृत पीडिता प्रियाचा भाऊ सुनील शिलवंत यांनी दिली. यावरून तुळजापूर पोलीस ठाण्यात पती पंकज घोडके, सासरे राजेंद्र घोडके व सासू वनमाला घोडके यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नानंतर सहाच महिन्यात घडलेल्या आत्महत्याच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.