दुबई : टी-20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू झाल्यावर लगेचच भारतीय संघाच्या गोटात आनंददायी वातावरण निर्माण झाले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ येत्या 24 ऑक्टोबरला होत असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. मात्र, त्यातही बेस्ट फिनिशर व संघाचा नवनियुक्त मेंटॉर महेंद्रसिंह धोनी भारतीय संघात दाखल झाला आहे.
धोनी या स्पर्धेसाठी भारतीय संघासाठी मेंटॉर म्हणून कार्यरत होणार आहे. दोन दिवसांपूर्वीच धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या आयपीएलचे विजेतेपद पटकावले. या यशानंतर धोनीचा भारतीय संघात तसेच स्पर्धेच्या बायोबबलमध्ये प्रवेश झाला आहे. धोनीने विश्वकरंडक स्पर्धेसाठी मानधन घेतलेले नाही.
भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने 2007 साली टी-20 विश्वकरंडक, 2011 साली एकदिवसीय सामन्यांचा विश्वकरंडक आणि 2013 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. आता धोनीच्या मिडास टचमुळे कोहलीचा भारतीय संघ या स्पर्धेत विजेतेपद मिळवत आयसीसी स्पर्धांच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार का हेच पाहणे रंजक ठरणार आहे.
भारतीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि महंमद शमी.
राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, दीपक चहर, अक्सर पटेल. मेंटॉर : महेंद्रसिंह धोनी
भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक
24 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान
31 ऑक्टोबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड
3 नोव्हेंबर: भारत विरुद्ध अफगाणिस्तान
5 नोव्हेंबर: भारत विरुद्ध बी-1
8 नोव्हेंबर: भारत विरुद्ध बी-2