क्रिकेट काॅर्नर : उशिरा सुचलेले शहाणपण

– अमित डोंगरे

श्रीलंकेत असलेल्या भारतीय संघाचे नवनियुक्त प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह बीसीसीआयच्या नविड समितीला अखेर उशिरा का होईना पण शहाणपण सुचले याचे समाधान वाटते.

श्रीलंकेत दाखल झाल्यावर भारतीय संघातील नवोदितांना सातत्याने रोटेशन पद्धतीनूसार सामने खेळण्याची संधी देऊ अशी केलेली घोषणा पहिल्या दोन्ही सामन्यांत हवेतच विरल्याचे दिसले होते. अखेर तिन सामन्यांची ही मालिका दोन्ही सामने जिंकत खिशात टाकल्यानंतर अखेरच्या तिसऱ्या सामन्यात निम्मा संघ बदलत नव्या खेळाडूंना संधी दिली गेली.

मालिका जिंकल्यानंतर या सामन्यासाठी भारतीय संघात दोन्ही सलामीवीर कायम राहिले मात्र, राहुल चहर, नितीश राणा, चेतन साकरिया, कृष्णप्पा गौतम आणि संजू सॅमसन यांना संधी मिळाली हे आगामी काळासाठी खूपच महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर नवदीप सैनीलाही संधी देण्यात आल्यामुळे त्यालाही पर्यटनापेक्षा सामना खेळणे उत्तम याची प्रचिती आली.

पहिल्या दोन्ही सामन्यांत आपल्या क्षमतेची चुणूक दाखवलेल्या कृणाल पंड्या, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्‍वर कुमार, दीकप चहर व इशान किशन यांना विश्रांती दिली गेली. खरे पाहायला गेले तर हे रोटेशन पहिल्या सामन्यापासूनच झाले पाहीजे होते. कारण ही मालिका याच नवोदितांसाठी महत्वाची होती, संघाच्या विजय किंवा पराजयापेक्षाही या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याचा अनुभव मिळणे जास्त अपेक्षित होते.

संघातील अष्टपैलू हार्दिक पंड्याचे स्थान मात्र, कायम ठेवले गेले. खरेतर याचेही आश्‍चर्यच वाटत आहे. पंड्याचा मिडास टच हरवला आहे हे तर दिसून येत आहे. पण त्याला आगामी काळात आयपीएल खेळायला मिळणार आहे. तसेही तो आता कागदावरच अष्टपैलू राहिला आहे. त्याने खांद्याला झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतरही गोलंदाजी फारशी केलेली नाही.
इशान किशनला वगळल्यामुळे संजू सॅमसनला संधी मिळाली.

या खेळाडूकडे अफाट गुणवत्ता आहे पण बिग मॅच फेल्युअरचा तो सातत्याने बळी ठरतो. या मालिकेत द्रविडने याच गोष्टींवर भर देणे अपेक्षित होते. सॅमसनही पॉथ्वी शॉ याच्याइतकाच गुणवान आहे पण त्याला नशीबानेही अनेकदा दगा दिला आहे. चांगला स्थिरावलेला असतनाही तो कित्येकदा बेजबाबदार फटका मारून बाद झाला आहे.

या खेळाडूंना संधी मिळण्यासह द्रविडकडून त्यांना सातत्याने मार्गदर्शन मिळावे हाच खरा या मालिकेचा हेतू असायला हवा होता. मात्र, द्रविडने आपला बायोडाटा मजबूत करण्यासाठी पहिल्या दोन्ही सामन्यांत एकच संघ खेळवला व मालिका जिंकल्यावर नवोदितांना संधी देण्याचा बोध घेतला. ही टीका आहे असे वाटत असले तरीही ती वस्तूस्थिती आहे हे देखील नाकारता येणार नाही. आपल्या देशात हीच मानसिकता आहे की आपली खुर्ची बळकट करायची व नंतर दुसऱ्याला टेकू द्यायचा.

श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी भारतीय संघाला दुय्यम संघ म्हणून हिणवले होते मात्र, याच संघाने त्यांच्यावर वर्चस्व राखत मालिका जिंकली. आता एकदिवसीय मालिका तर जींकलेली आहेच मग आगामी टी-20 सामन्यांच्या मालिकेत तरी संघातील सर्व खेळाडूंना रोटेशन पद्धतीने खेळवले जावे अशी आशा आहे.

एकदिवसीय मालिकेत शहाणपण उशिरा सुचले असले तरी त्याची भरपाई या मालिकेत व्हावी. मालिका जिंकण्यापेक्षा हाती असलेला गुणवान सेकंड बेंच जास्तीत जास्त अनुभवी कसा होईल यावर भर दिला जावा. द्रविड हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या प्रमुख संघाला असेच होतकरू खेळाडू सातत्याने मिळावेत यासाठी सध्यातरी त्याने प्रमुख भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्याच्या प्रयत्नांपेक्षा भारतीय संघाचे भविष्य ठरतील असे खेळाडू घडवण्यावर भर देणेच योग्य ठरेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.