पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने 147 करोनाबाधित

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस घटत असले तरी गेल्या 24 तासांत पुन्हा 147 नव्या रुग्णांची भर पडल्याने बाधितांचा आकडा 98 हजार 628 इतका झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 3 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

गुरुवारी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (शुक्रवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 147 जणांना करोनाची लागण झाली आहे. शहराबाहेरील एकाही व्यक्तीचा करोना अहवाला सकारात्मक आलेला नाही. तर गेल्या 24 तासांत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण शहरातील रहिवासी होते. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 1785 वर पोहोचला असून शहराबाहेरील 745 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूच्या आकड्याने 2530 ची संख्या आज गाठली.

गेल्या 24 तासांत मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील काळेवाडी, वडमुखवाडी आणि थेरगाव येथील तिघांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरातील 95 हजार 262 जण करोनामुक्त झाले असून, शहराबाहेरील 7493 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे.

आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 122 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या दोन दिवसांतील 2131 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयित असलेले 2270 जण महापालिकेच्या विविध रुग्णांलयांमध्ये दाखल झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.