Newasa Traffic: अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटा येथे सलग आलेल्या सुट्ट्या आणि नियोजनाचा अभाव यामुळे शनिवारी दुपारी प्रचंड वाहतूक कोंडी झाली. राजमुद्रा चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात दुपारी २ ते ४ वाजेच्या दरम्यान वाहनांच्या सुमारे दोन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या कोंडीमुळे वाहनधारकांसह स्थानिक व्यावसायिक आणि पोलिसांचेही प्रचंड हाल झाले. रस्ता दुरुस्ती आणि अतिक्रमणाचा विळखा – महामार्गावर सध्या रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यातच शनिवारची सुट्टी असल्याने पर्यटकांच्या आणि प्रवाशांच्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. ‘ट्रॅफिक जाम’मध्ये अडकलेल्या वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे स्थानिक व्यावसायिकांना मनस्ताप सहन करावा लागला. प्रशासनाने काही दिवसांपूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली होती, मात्र हे अतिक्रमण पुन्हा ‘जैसे थे’ झाल्याने रस्त्याचा श्वास गुदमरला आहे. सरकारी तिजोरीतून खर्च करून झालेली ही मोहीम अपयशी ठरल्याने सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठत आहे. Newasa Traffic दुभाजक हटवल्याने पेच वाढला – विशेष म्हणजे, सार्वजनिक बांधकाम विभागाने राजमुद्रा चौकात शेवगाव रोडवर पंधरा दिवसांपूर्वी रस्ता दुभाजक बसवले होते. मात्र, काही अज्ञात व्यक्तींनी जेसीबीच्या साहाय्याने हे दुभाजक रातोरात उखडून टाकले. हे दुभाजक कोणी काढले? याकडे विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे वाहतुकीचा पेच अधिकच वाढला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या ढिसाळ नियोजनाबद्दल जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जनतेची मागणी: पुन्हा फिरवा अतिक्रमणावर हातोडा – नेवासा फाटा येथील दैनंदिन वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी प्रशासनाने पुन्हा एकदा कडकपणे अतिक्रमण मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. तसेच, सरकारी मालमत्ता असलेल्या रस्ता दुभाजकांचे नुकसान करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई होणार का? असा सवालही सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. हेही वाचा – Today TOP 10 News: अजित पवार उपमुख्यमंत्री पद सोडणार?, 400 कोटींची चोरी ते तिसऱ्या महायुद्धाची भीती… वाचा आजच्या टाॅप बातम्या