नेवाशाच्या मिरवणुकीत ढोलपथकाचेच आकर्षण

नेवासे – नेवासे शहर, तसेच नेवासेफाटा, सोनई, भेंडे, घोडेगाव, कुकाणेसह अन्य गावांतील गणेश विसर्जन मिरवणुका उत्साहपूर्ण व शांततेच्या वातावरणात पार पडल्या. पहिल्यांदाच डीजेमुक्त वातावरणात मिरवणुका झाल्या. रात्री 11 वाजून पाच मिनिटांनी शेवटच्या गणपतीच्या महाआरतीने विसर्जन करण्यात आले.

121 वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक मानाच्या घाटाच्या गणपतीची आरती सायंकाळी चार वाजता नेवासे पोलीस ठाण्याचे निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांच्या हस्ते करण्यात आली. सायंकाळी पावणेपाच वाजता तिरंगा चौकापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. अग्रभागी सार्वजनिक गणेश मंडळाचा गणपती होता. पोलीस प्रशासन व नगरपंचायतीच्या वतीने तहसीलदार सुधीर पाटील, डॉ. गोर्डे, मुख्याधिकारी समीर शेख यांच्या हस्ते गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येथील काझी वाडयासमोरच्या तिरंगा चौकातील मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीत पारंपारिक पद्धतीने सनई चौघडा वाजविण्यात येत होता. मोहिनीराज मित्र मंडळाच्या बालकांच्या ढोलपथकाने लक्ष वेधून घेतले होते. मोहिनीराज मंदिर चौकामध्ये लोखंडे गल्लीतील मित्र परिवार तरुण मंडळाने व कोमटी गल्लीतील त्रिमूर्ती मित्र मंडळाने सादर केलेले ढोल पथक व झेंडापथक सर्वांचेच आकर्षण ठरले होते. जातीय सलोख्यासाठी योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ कार्यकर्ते गफूरभाई बागवान, ज्येष्ठ पत्रकार मधुकर देशपांडे, शांतता समितीचेसदस्य सुधीर चव्हाण यांचा पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

या वेळी विविध मंडळाने सादर केलेले लेझीम, ढोल पथक पाहण्यासाठी महिलांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, गोपनीय शाखेचे बाळासाहेब घुगरकर,नगरसेवक दिनेश व्यवहारे, रणजीत सोनवणे, राजेंद्र मापारी, शिवा राजगिरे, महेश मापारी यांनी मंडळाच्या पथकांचे स्वागत केले. मानाच्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीचे रात्री आठ वाजता प्रवरानदी पात्रात विसर्जन करण्यात आले. रात्री अकरा वाजता शेवटच्या गणपतीची महाआरती पोलीस उपअधीक्षक महेंद्र बगाडे यांच्या हस्ते करण्यात आली.

तेलकुडगावच्या “एक गाव एक गणपती’ची पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून शांततेत विसर्जन करण्यात आले. या मिरवणुकीला महिलासह तरुणांनी गर्दी केली होती. येथील राजमाता जिजाऊ बहुदेशीय युवा प्रतिष्ठानच्या वतीने गावात वृक्ष लागवड करण्याचे ठरवले आहे. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते गणपतीची आरती करून वृक्ष लागवड सुरू करण्यात आली.

मोटारबोटची व्यवस्था

नेवासे येथील प्रवरानदीच्या गणपती घाटावर गणपती विसर्जनप्रसंगी मोटारबोटची व्यवस्था करण्यात आली होती. निर्माल्य पायदळी तुडू नये, यासाठी कर्मचाऱ्यांनी स्वयंसेवक बनून निर्माल्य एका ठिकाणी जमा करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. ध्वनिक्षेपकावरून दिवसभर विशेष सूचना देण्याचे काम सुरूच होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)